आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्जमाफीतील घाेळ भाेवणार; आयटी सचिवांची उचलबांगडी; लवकरच कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या ऑनलाइन प्रक्रियेत महिनाभरानंतरही घोळ थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सरकारविराेधात चहूबाजूने टीका हाेत अाहे. अायटी विभागातील चुकांमुळे हे घाेळ हाेत असल्याचे सांगितले जात असून मुख्यमंत्र्यांनी या विभागाकडे त्याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली अाहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम अखेर रजेवर गेले आहेत. त्यांचा अतिरिक्त पदभार धारावी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर श्रीनिवास यांच्याकडे देण्यात आला आहे.  कर्जमाफीचा घोळ गौतम यांना भोवला असून काही दिवसातच त्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली आहे. 


दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा १८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र महिना उलटल्या नंतरही ७७ लाख शेतकाऱ्यांपैकी केवळ ५ हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही कर्जमाफी न मिळाल्याने स्वपक्षीय आमदारांसह राज्यातील शेतकऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे राज्य सरकारची ऐतिहासिक कर्जमाफी असूनही नाचक्की होत आहे. त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला असून या रोषाचा पहिला बळी आयटीचे प्रधान सचिव व्ही. के गौतम ठरले आहेत.


शुक्रवारी गौतम यांनी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्याकडे रजेसाठी अर्ज दाखल केला. त्यांना १५ दिवसांची अर्जित रजा मंजूर करून सुट्टीवर पाठविले आहे. त्यांचा पदभार तत्काळ श्रीनिवास यांच्याकडे सोपविला असून त्यांनी तो स्वीकारल्याची  माहती सूत्रांनी दिली.

 

धवसे यांची पाठराखण; राष्ट्रवादीचा अाराेप
मुख्यमंत्री यांचे  विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यावरही या घाेळाचे अाराेप करण्यात अाले हाेते. मात्र  फडणवीसांकडून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. कर्जमाफीच्या या घोळासाठी सहकार आणि आयटी खाते एकमेकांकडे बोट दाखवत असून या प्रक्रियेत पहिला ‘बळी’ गौतम यांचा ठरला असल्याची चर्चा आहे.

 

अाता २५ नाेव्हेंबरची नवीन डेडलाइन
कर्जमाफीबाबत सहकार विभागाने पाठविलेल्या ६६ रकान्यापैकी बँकांनी फक्त ४४ रकान्यात त्यांच्याजवळ असलेली माहिती भरली. उरलेली माहिती चुकीच्या पद्धतीने भरून पाठविल्याने प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला. परिणामी यादीतील घोळ महिनाभरानंतरही सुटत नसल्याने सरकारला घाम फुटला आहे. मुख्यमंत्री आणि सहकार विभागाने आता २५ नोव्हेंबरची डेडलाईन दिली आहे.या डेडलाईनपर्यंत ७५ टक्के कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...