आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैतिक पोलिसगिरी पडणार पोलिसांना महाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मालाडच्या मढ येथील लॉजची पाहणी करताना मालवणी पोलिसांनी १३ प्रेमी युगुलांविरोधात दंडात्मक कारवाई केल्यानंतर आता ही कारवाई अंगलट आली आहे. या कारवाईबाबत सर्वच थरातून टीकेचा सूर उमटू लागल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी अतिरिक्त आयुक्तांना चौकशीचे आदेश देत यापुढे अशा पद्धतीची कोणतीही कारवाई करू नये, अशाप्रकारचे अंतर्गत आदेशही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईच्या विरोधात कुणी राज्य मानवी हक्क आयोग किंवा न्यायालयात दाद मागितली तर पोलिसांना दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते, असे मत कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
मुंबईतील अक्सा, मढ, दानापानी या चाैपाट्यांलगत अनेक हॉटेल्स, लॉज आहेत. यापैकी काही ठिकाणी अनैतिक कामे चालत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्यानेच ६ ऑगस्टला ही कारवाई केल्याचे पोलिस सांगत आहेत. या परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलिस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी यापुढे हॉटेल आणि लॉजवर अशा प्रकारची कारवाई करू नका, असे आदेशच विभागातील पोलिसांना दिले आहेत. सोमवारी संध्याकाळी या परिसरातील सगळ्या लॉजमालकांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात येऊन या कारवाईचे सीसीटीव्ही फुटेजही सुपूर्द करून ही कारवाई चुकीची असल्याचा दावा केला आहे.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनीही, ही कारवाई पोलिसांच्या कार्यकक्षेबाहेरची असून या विरोधात कुणी न्यायालय किंवा मानवी हक्क आयोगाकडे गेल्यास पोलिसांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे. ‘दोन सज्ञान व्यक्ती स्वखुशीने एखाद्या ठिकाणी एकत्र राहत असतील तर तो सार्वजनिक अश्लीलतेचा भाग नसतो. अशा जोडप्यांची बंद खोलीत चौकशी करणे हा पोलिसांच्या कामाचा भाग नाही, असेही ते म्हणाले.