आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action Will Take Against Gosalkar, Udddhav Thakare Speak In The Case

घोसाळकरांवर कारवाई करणार,शीतल म्हात्रेप्रकरणी उध्‍दव ठाकारे यांचे आश्‍वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या मानसिक छळ प्रकरणाची गंभीर दखल अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. याप्रकरणी शनिवारी उद्धव यांनी शीतल म्हात्रे यांच्यासह नगरसेविका शुभा राऊळ व मनीषा चौधरी यांच्या तक्रारी तब्बल दीड तास जाणून घेतल्या आणि शेवटी या प्रकरणाचा ठपका असणा-या आमदार व विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे ठोस आश्वासन उद्धव यांनी दिले.
अनाधिकृत बांधकामाविरोधात आवाज उठवल्यामुळे म्हात्रे यांच्याविषयी अश्लील मजकूर मुंबई महापालिका तसेच दहिसर परिसरातील स्वच्छतागृहांमध्ये छापून आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामागे घोसाळकर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मुंबई महापालिकेतही याप्रकरणी नगरसेवकांनी जोरदार आवाज उठवला आणि महिला आयोगाने त्याची गंभीर दखल घेत घोसाळकरांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
घोसाळकर यांच्याविरोधात आवाज उठवूनही मातोश्रीवरून न्याय मिळत नसल्यामुळे म्हात्रे अस्वस्थ झाल्या होत्या. यामुळे त्यांना इस्पितळातही दाखल करावे लागले. अखेर महिन्याभराने ठाकरे यांनी नगरसेविकांना भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गोरेगाव ते दहिसरपर्यंतची शिवसेना विभागप्रमुख म्हणून घोसाळकरांनी हायजॅक केली असून शाखाप्रमुख, संघटक, कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकारी या सर्वांना सतत अपमानास्पद वागणूक दिली जाते. शिवसेनेतील महिलांना अशा प्रकारे वागणूक दिली जात असले तर ते खपवून घेतले जाणार नाही. अशा व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल. तुम्ही दहिसरमध्ये एखादा कार्यक्रम ठेवा. मी तुमच्या कार्यक्रमाला निश्चित येईन. शिवसेना कोणा एका विभागप्रमुखाची जहागीरदारी नाही. यापुढे तुम्ही निश्चिंत राहा. यापुढे तुम्हाला कोणाताही त्रास होणार नाही, याची मी काळजी घेईन, असे आश्वासन आम्हाला ठाकरे यांनी दिल्याची माहिती म्हात्रेंनी दिली.