आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Amol Kolhe News In Marathi,Shiv Sena, Maharashtra

प्रगतीची वाट दाखवणा-या शिवसेनेचा झेंडा हाती - अमोल कोल्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘शिवसेना हा एका विचाराने चालणारा पक्ष असून महाराष्ट्राला प्रगतीची वाट दाखवणाराही आहे. शिवसेनेच्या विचारांशी असलेल्या वैचारिक भूमिकेमुळेच मी या पक्षाचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला,’ अशी प्रतिक्रिया प्रख्यात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.


छोट्या पडद्यावर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे मनसेतर्फे मावळमधून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र त्यांनी आश्चर्यकारकरीत्या शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत कोल्हे म्हणाले की, ‘मी मनसेत कधीही गेलो नव्हतो वा जाण्याचा विचारही केला नव्हता. राज ठाकरे यांनी अनेकांशी संपर्क साधला होता तसाच माझ्याशीही साधला होता. महाराष्ट्राला संयमी आणि सुसंस्कृत नेता हवा आहे. आंदोलनेही आततायी नसावीत असे मला वाटते. उद्धव ठाकरे हे संयमी आणि सुसंस्कृत असल्यानेच मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.’


शिवाजी महाराजांची भूमिका करणा-या महेश मांजरेकर यांना मनसेने तिकीट दिले आहे. तुम्हीही याच भूमिकेने लोकप्रिय झालात. या दोन अभिनेत्यांची लढाई कशी असेल? या प्रश्नावर कोल्हे म्हणाले, ‘अभिनय आणि राजकारण वेगळ्या गोष्टी आहेत. मांजरेकर चांगले निर्माते, दिग्दर्शक आहेत. कलाकार म्हणून मी त्यांचा आदरच करतो. त्यांच्याशी माझी लढाई नाही, कारण ते निवडणुकीला उभे आहेत तर मी नाही. सर्व कलाकार एकच असतात फक्त विचारांच्या मुद्द्यावर ते वेगवेगळ्या पक्षाचे काम करतात.’


कोल्हेंचे बोल
* ‘पाच वर्षांपूर्वी माझी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर मात्र कधीही भेट झाली नाही की बोलणेही झाले नाही. राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.’
* मी निवडणूक लढवणार नाही. केवळ निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रचार करणार आहे.
* कोणीही भेटायला बोलावले तर जायचे असते, त्यामुळे मीही राज ठाकरेंना यापूर्वी भेटायला गेलो होतो. शिवाजी महाराजही औरंगजेबाला भेटायला गेले होते.