मुंबई - अभिनेता
सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील साक्षीदारांनी पोलिसांकडे दिलेल्या साक्षीची कागदपत्रे गहाळ झाल्याचे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
या प्रकरणातील साक्षीदार कल्पेश वर्मा आणि अमीन शेख यांनी दिलेल्या साक्षीची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. कल्पेश जे. डब्ल्यू. मेरियट हॉटेलचे व्यवस्थापक असून अमीन शेख हा येथील बेकरीत हेल्परचे काम करतो. त्यांनी दिलेल्या साक्षीची कागदपत्रे गहाळ झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. ही कागदपत्रे शोधून काढा, असे आदेश न्यायालयाने वांद्रे पोलिसांना दिले आहेत.
‘हिट अँड रन’ प्रकरणाची मुंबई सत्र न्यायालयात 23 डिसेंबरपासून नव्याने सुनावणी सुरू आहे. यात सर्व साक्षीदार आणि पुराव्यांची पुनर्तपासणी केली जाणार आहे. 2002 मध्ये सलमान खानने भरधाव गाडी चालवत पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते.
या प्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. गेल्या सुनावणीत एका साक्षीदाराने आपल्या जबाबावरून घूमजाव केले होते.