आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोपानकाकां’ची सहा दशकांची वाटचाल !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बारीक अंगकाठी, अभिनयाच्या चंदेरी दुनियेत होणारा पदोपदी अवमान, अभिनयावर असलेला विश्वास, 60 वर्षांचे अभिनयाचे करिअर, मराठी नाटके, वगनाट्ये, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी मालिका यांची लांबच लांब रांग हे अनोखं मिश्रण जुळून आणले ते म्हणजे सुहास भालेकर या नटाने.

नाटकात काम करणे हे करिअर सोडाच पण लज्जास्पद आहे, असे वाटणार्‍या काळात जन्माला आलेला साबाजी पुढे जाऊन मराठीतला उल्लेखनीय कलाकार सुहास भालेकर होतो ही एखाद्या चित्रपटाला शोभणारी पटकथा म्हणजे मराठी तार्‍याला मानाचा मुजरा ठरावी.
कामगार वस्तीतल्या बालपणीच मनावर झालेले नाटकांचे गारूड वयाची 80 उलटली तरी उतरले नाही. अलिकडे सुरू असलेल्या झी वाहिनीवरील ‘असंभव’ या मालिकेत वयाच्या 82 व्या वर्षीही उत्तम अभिनय कशाशी खातात याचे उदाहरण देणारे ‘सोपानकाका’ आजही लक्षात राहतात. बारीक अंगकाठी असल्याने केवळ विनोदी भूमिका वाट्याला येणारे सुहास भालेकर यांनी आपल्या अभिनयकौशल्याने संधीचे सोने केले. भूमिका लहान असो मोठी सुहास भालेकर यांच्या भूमिकेचे कौतुक झाले आणि त्यांना करिअरमधली पुढची पायरी मिळत गेली. कीर्तनकार वडील यांच्याकडून आलेली शुद्ध वाणी आणि मुलाचे स्वप्न समजून घेणारी आई यांच्यामुळे मराठी कलासृष्टीला सुहास भालेकरांसारखा जिद्दी नट मिळाला.

एकच प्याला, बेबंदीशाही नाटकात भूमिका
शाहीर साबळेंपासून विजया मेहतांपर्यंत आणि व्ही. शांताराम यांच्यापासून ते महेश भट्टांपर्यंत अनेक दिग्गजांबरोबर सुहास भालेकर यांनी काम केले आहे. पंतांची सून, छापील संसार, एकच प्याला, बेबंदशाही, अंमलदार इत्यादी नाटकं. यमराज्यात एक रात्र, मीच तो बादशाह, फुटपायरीचा सम्राट, कोंडू हवालदार इत्यादी वगनाट्ये. झुंज, चानी, आई, निवडुंग, अष्टविनायक इत्यादी मराठी चित्रपट. शक, चक्र, सारांश, दामिनी, बरसात इत्यादी हिंदी चित्रपट आणि गोट्या, भाकरी आणि फूल, असंभव, कशाला उद्याची बात, वहिनीसाहेब या मालिका अशी 60 वर्षांच्या कारकीर्दीची लांबलचक यादी सुहास भालेकर यांच्या नावावर आहे.

प्रत्येक पिढीला आपलासा वाटणारा कलावंत
‘शाहीर साबळे आणि पार्टी’त 16 वर्षे कलाकार आणि माणूस म्हणून घडत जाणार्‍या सुहास भालेकरांनी लोकनाट्यातला चौकसपणा, संगीत नाटकातला ‘तळीराम’चा खलनायकी अभिनय, विजया मेहतांचा शिस्तबद्धपणा, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर या चित्रपटातल्या पिढीसोबत काम करण्याचा लवचीकपणा, मालिकेत कॅमेर्‍याची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न.. अभिनयातल्या एकाही बाजूला त्यांनी स्पर्श केला नाही, असे झालेले नाही आणि म्हणूनच मराठी कलाक्षेत्रातल्या प्रत्येक पिढीला सुहास भालेकर आपलेसे वाटत होते. आपल्या विविधढंगी भूमिकांनी जुन्या व नव्या पिढीच्या मनात घर करून राहण्याचे कसब भालेकरांनी चांगलेच अवगत केले होते.