मुंबई - नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अरुण ढवळे यांनी मासिक उत्पन्न दाखवले 10 हजार रुपये. आदर्श सोसायटीत फ्लॅट घेतला. माजी मुख्यमंत्री व 2003-04 या काळात महसूलमंत्री राहिलेले डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांचे जावई डॉ. अरुण यांनी त्यासाठी 55 लाख रुपयांचे पेमेंट केले. त्यापैकी 5.5 लाख पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कर्ज घेतल्याचे दाखवले. चव्हाण आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीच ‘आदर्श’ घोटाळ्याचा चौकशी अहवाल फेटाळून लावला आहे.
सरकारने अंतरिम अहवाल स्वीकारला; परंतु अंतिम अहवाल का फेटाळला, असा चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांचा सवाल आहे. 200 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवून खालपासून वरपर्यंत कसा भ्रष्टाचार करण्यात आला, हे 800 पानी अहवालात सिद्ध करण्यात आले.
300 अधिकृत दस्तऐवज मिळवून हा घोटाळा उघडकीस आणणारे आरटीआय कार्यकर्ते आनंद जोशी यांना तर चौकशी आयोगावरही संशय आहे. हा आयोग स्थापन होईपर्यंत न्यायमूर्ती पाटील राज्य सरकारचे विधी सचिव होते. त्यांच्याकडून नि:पक्षपाती अहवालाची अपेक्षाच करता येत नाही, असे जोशी यांचे म्हणणे आहे.
या घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आणि केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचेही नाव आहे. दोन माजी लष्करप्रमुख दीपक कपूर आणि एन. सी. विज यांच्याखेरीज 12 आयएएस आणि अनेक लष्करी अधिकारीही त्यात सामील आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या याचिकेवर परिणाम होणार नाही, असे या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे वकील वाय. पी. सिंह म्हणतात. चौकशी अहवाल का फेटाळून लावला, याचे उत्तर मात्र सरकारला द्यावे लागणार.
धक्कादायक वास्तव
65 ते 80 लाखांच्या फ्लॅटसाठी खोटारडेपणाचा कळस
कारगिलचे हीरोही बनावट निघाले
सोसायटीच्या पहिल्या यादीत दोन नावे अशी आहेत की, त्यांना कारगिलचे हीरो संबोधण्यात आले होते. मेजर राजीवकुमार हरिनारायण सिंह आणि सुभेदार रामनारायण अच्छेलाल ठाकूर अशी त्यांची नावे; परंतु या दोघांचाही कारगिल युद्धाशी संबंध नाही.
लष्करप्रमुखानेही केली हडेलहप्पी
माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांचा पगार 40 हजार रुपये; पण फ्लॅट मिळवण्यासाठी 23,450 रुपये पगार दाखवला. त्याची कबुली त्यांनी आयोगासमोर दिली. पाच लष्करी अधिका-यांनी आदर्शसाठी मुंबईचे बनावट अधिवास प्रमाणपत्र दिलेले आहे.
धन्याढ्यांचे फ्लॅट चपराशाच्या नावे
चपराशी असलेले एस. जी. अत्राम यांचे मासिक उत्पन्न 9000 रुपये. फ्लॅटसाठी त्यांनी 59 लाख रुपये भरले. ते त्यांना सॅन फायनान्स कार्पोरेशनकडून मिळाले. ही कंपनी नितीन गडकरी यांचे विश्वासू अभय व अजय संचेती यांची आहे.
नाव ड्रायव्हरचे फ्लॅट गिडवाणींचा
टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील ड्रायव्हर अमोल कारभारी यांचा आदर्शमध्ये फ्लॅट आहे. अमित गिडवाणी यांनी आपणास पैसे दिले, असे त्यांनी कबूल केले आहे. ते आमदार आणि आदर्श सोसायटीचे सहसचिव कन्हैयालाल गिडवाणी यांचे चिरंजीव आहेत.
जयराज फाटक
महानगरपालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव
इमारतीची उंची वाढवण्यासाठी
पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये किनारपट्टीलगत फक्त 6 ते 7 मजले बांधता येत असताना 28 मजल्यांचे तोंडी आदेश दिले. बदल्यात मुलगा कनिष्कला फ्लॅट मिळाला.
अशोक चव्हाण
तत्कालीन मुख्यमंत्री
तीन फ्लॅट मिळवून दिले
@पत्नी अमिता यांची वहिनी सीमा शर्मा
@सासरे मनोहरलाल शर्मांचे भाऊ मदनलाल मिल्खिराम शर्मा
@सासू भगवती शर्मा यांना एक फ्लॅट
वारंवार बदलत राहिले नियम
2002 मध्ये रस्त्याची रुंदी कमी केली. मोकळ्या जागेच्या नियमातून सूट दिली. पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नसतानाही प्रकल्पाला थेट मंजुरी देण्यात आली. 40 टक्के फ्लॅट नागरिकांना देण्यास मंजुरी दिली.
संजय बर्वे, वाहतूक शाखेचे सहआयुक्त
रस्त्याची रुंदी कमी करण्यासाठी
संजय बर्वे वाहतूक शाखेचे सहआयुक्त होते. त्यांनी या पदावर असताना आदर्श सोसायटीला लागून असलेल्या प्रकाश पेठे मार्गाची रुंदी कमी केली आणि त्यांच्या वडिलांना आदर्शमध्ये फ्लॅट मिळाला. वडील एस. व्ही. बर्वे यांनी फ्लॅटसाठी संजय बर्वेच्या पत्नी आणि त्यांच्या सूनेकडून कर्ज घेतले. 86 वर्षीय एस. व्ही. बर्वे कन्हैयालाल गिडवाणी यांचे विश्वासू आणि काँग्रेसचे क्रियाशील सदस्यही राहिले आहेत.
प्रदीपकुमार व्यास, 2002 ते 2005 दरम्यान मुंबईचे जिल्हाधिकारी
अर्जांच्या छाननीसाठी...
प्रदीपकुमार व्यास 2002 ते 2005 दरम्यान मुंबईचे जिल्हाधिकारी होते. त्यांची पत्नी सीमा व्यास (त्याही आयएएस अधिकारी आहेत) यांना फ्लॅट मिळाला. अर्जांची चौकशी करणे तसेच आदर्शचे काम लवकर होईल, हे पाहण्याचीही त्यांची जबाबदारी होती. त्यांनी आदर्शच्या जमिनीवर लष्कराने विकसित केलेले उद्यान उद्ध्वस्त होऊ दिले. लष्करी तळाने उपस्थित केलेल्या आदर्शमुळे सुरक्षेसंबंधीच्या संभाव्य धोक्याकडेही दुर्लक्ष केले.
मेजर जनरल टी. के. कौल, आदर्श प्रकल्पाचे प्रमोटर
कौल यांनी आपली मुलगी प्रियंका, मुलीचा मानलेला भाऊ मेजर अरुण प्रताप सिंह आणि भाची शीतल यांना फ्लॅट मिळवून दिला. त्यांनीच कारगिलच्या शहिदांच्या नावे सोसायटी बनवली, लोकांना एकत्र आणले. मग लष्करी अधिका-यांना भेटून प्रकल्पाला मंजुरी मिळवून देत गेले. आदर्शची जागा लष्कराची नाही, या मंजुरीचाही त्यात समावेश आहे.
रामानंद तिवारी,
नगर विकास विभागाचे प्रधान सचिव
आरक्षण उठवण्यासाठी
त्यांनी फक्त रस्त्याची रुंदीच कमी करण्यासाठी मदत केली नाही, तर बेस्टच्या प्लॉटवरील आरक्षण उठवण्यासही मदत केली. त्या बदल्यात मुलगा ओंकारला फ्लॅट मिळाला.
उत्तम खोब्रागडे,
बेस्टचे तत्कालीन जीएम
बेस्टचा प्लॉट रिकामा करून मिळवला देवयानीसाठी फ्लॅट
भारतीय मुत्सद्दी देवयानी खोब्रागडे यांना आदर्शमध्ये वडिलांच्या वजनामुळेच फ्लॅट मिळाला. खोब्रागडे बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी आदर्शसाठी बेस्टच्या प्लॉटवरील आरक्षण उठवले.
104 फ्लॅट : प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी
104 फ्लॅटपैकी 37 फ्लॅट लष्करी अधिका-यांना देण्यात आले परंतु त्यापैकी फक्त तिघांचाच कारगीलशी संबंध होता.
25 अर्जदार फ्लॅट घेण्यासाठी पात्र नव्हते.
04 फ्लॅट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकांसाठी
22 फ्लॅट नाव एकाचे, मालक दुसराच
12 अधिकारी
नियम मोड्ल्याबद्दल फ्लॅट मिळवले.
विशेष म्हणजे यापैकी जेवढे बेनामी फ्लॅट मिळाले आहेत, त्यांना कोणतीही कागदपत्रे, हमी किंवा व्याजदराशिवायच कर्ज देण्यात आले आहे.