आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adarsh tainted Top Bureaucrats Jairaj Phatak, Pradeep Vyas Reinstated

‘आदर्श’मधील व्यास, फाटकांना मिळाली नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळय़ाप्रकरणी तुरुंगाची हवा खाल्लेल्या तसेच दोन वर्षापेक्षा अधिक काळ निलंबित असलेल्या जयराज फाटक आणि प्रदीप व्यास या राज्य सेवेतील दोन ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांना शुक्रवारी नियुक्ती देण्यात आली.
फाटक यांना महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तर प्रदीप व्यास यांना उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

फाटक 1978 च्या बॅचचे आयएएस आहेत. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी हायराईज बिल्डींग समितीची परवानगी न घेता आदर्शची उंची वाढवण्यास परवानगी दिली होती. त्या मोबदल्यात त्यांचा मुलगा कनिष्क यास आदर्शमध्ये सदनिका मिळाली, असा सीबीआयने त्यांच्यावर आरोप ठेवला आहे.

व्यास 1989 च्या बॅचचे आयएएस आहेत. मुंबई शहराचे जिल्हाधिकारी असताना आदर्शच्या भूखंडाचे आरक्षण त्यांनी बदलले. त्या मोबदल्यात त्यांच्या पत्नी ज्या आयएएस आहेत, त्यांना आदर्शमध्ये सदनिका मिळाल्याचा सीबीआयने आरोप ठेवला आहे.
सरकारी अधिकार्‍यास दोन वर्षापेक्षा अधिक काळ निलंबित ठेवता येत नाही. त्यामुळे मागच्या आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी दोन्ही निलंबित अधिकार्‍यांना सेवेत रूजू करून घेतले होते. मात्र, अद्याप त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या नव्हत्या.

1982 च्या बॅचचे आयएएस असलेल्या ए. बी. कुलकर्णी यांना महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपद देण्यात आले आहे. केंद्रीय प्रतीनियुक्तीवरून परत आलेल्या मनीषा वर्मा यांना गुंतवणूक व राजशिष्टाचार या विभागाचे सचिव पद देण्यात आले आहे. त्या 1993 च्या बॅचच्या आयएएस असून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कार्यरत राहतील. 1995 च्या बॅचचे आयएएस असलेल्या एस. बी. पाटील यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

1996 च्या बॅचचे आयएएस असलेल्या संजय खंदारे यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद देण्यात आले आहे.
1998 च्या बॅचचे आयएएस असलेल्या एस. पी. कडू-पाटील यांना महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती दिली आहे.
2000 च्या बॅचच्या आयएएस सोनाली पोंक्षे-वायंगणकर यांना नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आले आहे.