आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र अपत्याचा छळ; घटस्फोट मिळणे शक्य!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सावत्र अपत्याला वाईट वागणूक देणे म्हणजे एक प्रकारे मानसिक छळच आहे. पतीपासून होणार्‍या या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी पत्नीला घटस्फोट मिळू शकतो, असा महत्त्वपूर्ण निकाल वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिला. या प्रकरणी न्यायाधीश लक्ष्मण मगदूम यांच्यापुढे सुनावणी सुरू होती.

वांद्रे येथील एका 39 वर्षीय महिलेने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या महिलेचा पती अमेरिकेत राहतो. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी झाली होती. या मुलीला दुसरा पती व त्याचे कुटुंबीय वाईट वागणूक देत असल्याची महिलेची तक्रार होती. न्यायालयाने साक्षीपुराव्यांच्या आधारे तिचे म्हणणे ग्राह्य धरत तिचा घटस्फोट मंजूर केला. या महिलेचे दुसरे लग्न जानेवारी 2004 मध्ये अमेरिकेत पार पडले होते. तत्पूर्वी तिने दुसर्‍या पतीला मुलीबद्दलची माहिती दिली होती. त्या वेळी पतीने तिची काळजी घेण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु काही काळातच पतीची वागणूक बदलली. त्याने क्षुल्लक कारणांवरून या मुलीचा छळ सुरू केला. यावरून पती-पत्नींमध्ये सातत्याने खटके उडू लागले. तो पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेऊन तिच्यावर वेगवेगळे आरोप करू लागला. त्यामुळे 2006 मध्ये पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.