आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यसने, लग्नाच्या कर्जांचा बाेजाही शेतकरी अात्महत्यांना कारणीभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतीशिवाय इतर कारणांसाठी घेतलेले कर्ज न फेडता अाल्यामुळे यवतमाळ आणि उस्मानाबादमध्ये शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले अाहे. व्यसनाधिनता, मुलीच्या लग्नासाठी घेतलेली कर्जे यासारख्या काही सामाजिक कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले अाहे, असा निष्कर्ष आत्महत्यांची कारणे शोधण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने काढला आहे. त्यावर या विभागातील अार्थिक अडचणीत शेतक-यांना मदत करण्यासाठी बँकर्सची एक बैठक लवकरच घेण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शुक्रवारी समितीच्या सदस्यांना दिले अाहेत.

राज्य सरकारतर्फे सर्व मदत केली जात असतानाही शेतकरी आत्महत्या का करतात याची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली हाेती. या अभ्यासासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून यवतमाळ आणि उस्मानाबाद या सर्वाधिक अात्महत्या घडलेल्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. समितीने या दोन्ही भागांचा दौरा करून अहवाल तयार केला. मुख्य सचिवांनी शुक्रवारी समितींबरोबर चर्चा करून दौ-याचा आढावा घेतला.

बैठकीस उपस्थित एका अधिका-याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले, उस्मानाबाद आणि यवतमाळचा प्राथमिक दौरा केल्यानंतर असे आढळून आले की, शेतीशिवाय इतर कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचा डाेंगर वाढल्यामुळेच शेतक-यांनी जास्त आत्महत्या केलेल्या आहेत. यामध्ये व्यसनासाठीचा खर्च, मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्ज वा अन्य काही कारणांसाठी काढलेल्या कर्जामुळे आत्महत्यांचे केलेल्यांचे प्रमाण जास्त आहे. सरकारतर्फे दिली जाणारी मदत ही फक्त शेतीसाठी असल्याने अन्य कारणांमुळे होणा-या आत्महत्या थांबवण्यासाठी वेगळ्या उपायांची आवश्यकता आहे.’ दरम्यान, समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे साेपवला जाणार असल्याचे सांगण्यात अाले.

निष्कर्षावर कठाेर टीका
शेतकरी अात्महत्यांची कारणे शाेधण्यासाठी अाजवर अनेक सरकारी समित्या, खासगी संस्थांनी काम केले. त्यातूनही याच प्रकारे अनेक सामाजिक कारणेही अात्महत्यांसाठी प्रवृत्त करत असल्याचे समाेर अाले हाेते. मात्र तेव्हा शेतकरी संघटना व काही इतर सामाजिक संघटनांनी या निष्कर्षांवर कठाेर शब्दात टीका केली हाेती.

कारणे काय?
>व्यसनाधीनता हे शेतकरी अात्महत्यांमागील एक प्रमुख कारण अाहे. त्यामुळे वाढती व्यसनाधीनता राेखण्यासाठी उपाय करण्याची गरज.
>ग्रामीण भागातील सामूहिक विवाह सोहळेही बंद झाले अाहेत. त्यामुळे गरीब शेतक-यांना लग्नासाठी कर्ज काढावे लागते.
>भजन मंडळींना मिळणारे कार्यक्रम बंद झाले अाहेत. पूर्वी यातून ग्रामीण भागात काही उत्पन्न मिळायचे. अाता ते बंद झाल्याने उत्पन्नाचा स्त्राेत घटला.

उपाय काय?
>सामाजिक न्याय विभागातर्फे ग्रामीण भागात सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याची आवश्यकता.
>भजनांचे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर पुन्हा सुरू करण्याची गरज. असे झाल्यास भजन मंडळींना आर्थिक स्त्राेताचा मार्ग सुरू हाेईल
>गावातील पाेलिस पाटलांची मदत घेऊन कर्जबाजारी शेतक-यांना मदत करण्यासाठी उपाय याेजने. त्यांच्या मदतीने समुपदेशन करणे.