आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच सरकारला आदित्य म्हणाले नालायक; शिक्षणाचे अच्छे दिन कधी येणार? सरकारला सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सत्ताबदल झाला आपले सरकार आले, असे वाटले होते. मात्र, आधीच्या नालायक सरकार आणि या सरकारमध्ये काहीही फरक वाटत नाही, अशा शब्दांत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सत्तेत असलेल्या आपल्याच सरकारवर टीका केली. मात्र, सत्ता हातात असताना बदल घडवायचे सोडून टीका का करता, असा प्रश्न मोर्चात उपस्थित काही कार्यकर्त्यांनीच बोलताना उपस्थित केला.

केजी ते पीजीमधील शिक्षणाच्या गोंधळाविरोधात आवाज उठवण्यासाठी युवा सेनेतर्फे गिरगाव चौपाटी ते मरीन लाइन्स असा शनिवारी मोर्चा काढण्यात आला. मात्र, या मोर्चात विद्यार्थी कमी आणि युवा सेनेचे कार्यकर्तेच जास्त दिसत होते. तसेच म्हणावी तशी गर्दीही न जमल्याने हा मोर्चा तसा फसल्यासारखाच होता. आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी झाले नव्हते. मात्र मरीन लाइन्स येथे त्यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांच्या भाषणात टीकेशिवाय काहीही नव्हते.
आदित्य ठाकरे म्हणाले, आपले सरकार आले असे वाटले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत शिक्षणातील अनागोंदी दूर झाल्या नाहीत. शिक्षणमंत्र्यांना भेटून त्यांना अडचणींची माहिती दिली. त्यांनी प्रश्न सोडवतो, असे आश्वासन दिले होते. परंतु दीड वर्षातील हा प्रवास सुशासन नसून आश्वासन असल्याचे वाटत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना एटीकेटी लागते की काय असे वाटू लागले आहे. शिक्षण मंत्र्यांना भेटून काहीही उपयोग झाला नसल्यानेच मोर्चा काढला.
केजी साठी प्रवेश कायदा कधी येणार याचे उत्तर नाही, पालक आणि विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो, खरे तर याची गरज नाही. नववीत दीड लाख विद्यार्थी नापास झाले ही आजची शिक्षण पद्धती. दप्तरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, डिजिटल इंडियाचा शिक्षणात वापर का करीत नाही, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला.
बातम्या आणखी आहेत...