आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adivasi Reservation News In Marathi, Vasant Purke, Divya Marathi

'सुप्रिया सुळेंचे लोकसभेतील मताधिक्य कमी झाल्याने आदिवासींचा बळी देऊ नका'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘केवळ सुप्रिया सुळेंचे लोकसभेतील मताधिक्य कमी झाले म्हणून वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी कोट्यवधी आदिवासींचा बळी देण्याचे पाप माथी लावून घेऊ नका,’ असे खरमरीत पत्र विधानसभेचे उपाध्यक्ष, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिले आहे. धनगर समाजातील अनेक जणांनी आदिवासींची बोगस प्रमाणपत्रे तयार करून त्यांच्या वाट्याच्या नोक-या बळकावल्याचा आरोपही पुरकेंनी पत्रात केला आहे.

शरद पवार यांनी शनिवारी धनगर आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला होता. पवारांच्या या भूमिकेबाबत आदिवासींमध्ये नाराजी असल्यामुळेच पुरके यांनी पवारांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी पवारांच्या भूमिकेचा निषेध तर केलाच, शिवाय धनगर समाजाला आदिवासींच्या वाट्याचे आरक्षण देऊ नका, अशी विनंतीही केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, धनगर मुळात ओबीसी असून त्यांनी ओबीसींच्या सवलती घेतल्या आहेत. काहींनी आदिवासींची बोगस प्रमाणपत्रे मिळवून त्यांच्या सवलती, तर काहींनी एसबीसींच्या दोन टक्क्यांच्या सवलतीही लाटल्या आहेत, मात्र आता आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल या भीतीने आंदोलन सुरू आहे.

आजवर चकार शब्द नाही
आदिवासींच्या वाट्याच्या आरक्षणाबाबत बोलणा-यांनी आजपर्यंत मागासवर्गाच्या वाट्याचे आरक्षण इतर कुणालाही देण्याबाबत चकार शब्द उच्चरला नाही. त्याचे कारण दलित समाजाचे राजकीय उपद्रवमूल्य अधिक आहे. मग आदिवासींवर अन्याय का? राजकीय उपद्रवमूल्याच्या दृष्टीने कमजोर असलेल्या आदिवासींच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न आता दुबळ्यांमध्ये समाविष्ट होऊ पाहणारे राज्यकर्ते करत आहेत, असा टोला मराठा आरक्षणाचा संदर्भ देत पुरकेंनी लगावला आहे.