आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावमुक्तीसाठी प्रयत्न: प्रशासनाला हवीय माहिती, पोलिसांना मांडायच्यात व्यथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यात आठवड्याभरापूर्वी एका पाेलिस कर्मचा-याने अापल्या वरिष्ठाची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केली. या प्रकाराने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने पोलिसांच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात एक प्रश्नावली पाठवण्यात आली अाहे. या प्रश्नावलीद्वारे पोलिस प्रशासनाला अापल्या कर्मचा-यांच्या मानसिक स्थितीची तसेच व्यक्तिगत माहिती हवी अाहे. मात्र, या प्रश्नावलीच्या माध्यमातून सामान्य पोलिस कर्मचा-यांना मात्र आपल्या व्यथा मांडायच्या आहेत.

सलग ड्यूटी आणि कार्यबाहुल्यामुळे वारंवार रद्द होणा-या सुट्या यामुळे पोलिस तणावग्रस्त असतात. अशा वेळी त्यांची मानसिक स्थिती तपासण्यासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिगत वर्तणुकीबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांच्या प्रश्नावलीत कोणते प्रश्न आहेत याबाबतची माहिती पोलिस खात्यातील विश्वसनीय सूत्रांकडून ‘दिव्य मराठी’ने मिळवली. विशेष म्हणजे या प्रश्नावलीत प्रत्येक पोलिस कर्मचा-याने आपल्या पोलिस ठाण्यातल्या एका सहका-याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. तसेच अशी माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाणार असल्याचे या प्रश्नावलीच्या सुरुवातीलाच नमूद करण्यात आले आहे. त्यातील उत्तराद्वारे प्रत्येक पोलिस कर्मचा-याचे व्यक्तिश: परीक्षण केले जाणार आहे. यासाठी तब्बल १२० मनोविकार तज्ज्ञांच्या एका गटाची नियुक्ती करण्यात आली असून हे पथक मुंबई पोलिसांतील प्रत्येक कर्मचा-याबाबतच्या माहितीचे स्वतंत्रपणे विश्लेषण करणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर पोलिसांना तणावमुक्त करण्याबाबतचा एक आराखडा तयार केला जाणार आहे.

काय अाहे प्रश्नावली?
१) तो किंवा ती पाेलिस कर्मचारी मद्यप्राशन करते का?
२) तुमचा सहकारी असलेल्या त्या व्यक्तीची पोलिस ठाण्यात अथवा पोलिस ठाण्याच्या बाहेर लोकांशी कशी वर्तणूक आहे? तसेच ती व्यक्ती स्त्रीलंपट आहे का?
३) ती व्यक्ती जुगारी आहे का?
४) त्या व्यक्तीला अमली किंवा मादक पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन आहे का?
५) ती व्यक्ती लोकांकडून पैशांची मागणी करते का? खंडणी गोळा करते का?
६) तो किंवा ती कर्मचारी वारंवार गैरहजर राहते का? वैद्यकीय रजा वारंवार घेते का?
७) ती किंवा तो सहकारी पाेलिस कर्मचारी तापट किंवा खुनशी स्वभावाचा आहे का?

आपली व्यथाही मांडा
पोलिसांच्या प्रश्नावलीत आपली मते व्यक्त करण्याबाबतही एक रकाना असून त्यात सर्व कर्मचा-यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाचा उल्लेख करावा, अशा आशयाचा संदेश सध्या एसएमएस आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोलिस कर्मचा-यांमध्ये फिरत आहे. एका पोलिस अधिका-यामार्फत हा संदेश ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला असून त्यात खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.

सर्व पोलिसांना कळकळीची विनंती
>पोलिस शिपाई ते निरीक्षक, महिला कर्मचा-यांसाठी आठ तास ड्यूटी असणे आवश्यक असल्याचे नमूद करा.
>सहाव्या वेतन आयोगानुसार तसेच केंद्रीय कर्मचा-यांच्या धर्तीवर महिला कर्मचा-यांना २ वर्षांची बालसंगोपन रजा द्या.
> महिला कर्मचा-यांना पोलिस ठाण्यात स्वतंत्र महिला कक्ष तयार करा.
>त्रासाविना हक्काच्या रजा मंजूर करा.
>वर्षातून एकदा अर्जित रजा मंजूर करणे बंधनकारक करा, कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष भेद नसावा.
>आपणास आवश्यक वाटत असलेले इतर मुद्दे जरूर मांडा. कृपया प्रश्नावली भरताना एकी दाखवा. आशावादी राहूया. किमान या वेळी काहीतरी चांगले बदल घडतील. हा संदेश आपल्या खात्यातील संपर्कात असलेल्या प्रत्येकाला पाठवा.