आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऐ दिल है...’ची ‘मुश्किल’ मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने दूर, मनसेने विरोध मागे घेतला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’या चित्रपटाला असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) विरोध सशर्त मागे घेत असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात काम देणार नाही, चित्रपट सुरू होण्यापूर्वी भारतीय जवानांंना श्रद्धांजली आणि आर्मी वेल्फेअर फंडात ५ कोटी रुपये जमा करण्याच्या तडजोडीवर चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि राज ठाकरे यांच्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला मनसेने केलेल्या विरोधानंतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वत: फोन करून तोडगा काढण्याची विनंती केल्याची माहिती राज यांनी या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, मनसेने काही अटी घातल्या होत्या. त्या निर्माता व दिग्दर्शकांनी मान्य केल्याने मनसे चित्रपटाच्या प्रदर्शनाला केलेला विरोध मागे घेत अाहे. पाक कलाकारांबाबत चित्रपट निर्माता व दिग्दर्शकांनी घेतलेली नमती भूमिका हा मनसेचा विजय असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.
अशी झाली तडजोड...
> मुख्यमंत्र्यांसमक्ष झालेल्या तडजोडीच्या बैठकीत चित्रपटाच्या सुरुवातीला शहिदांना श्रद्धांजलीचा संदेश प्रसारित करण्याची अट होती. ती निर्मात्यांनी मान्य केली.
> भविष्यात पाक कलाकारांना काम देण्यावर पूर्ण बंदी व प्रायश्चित्त म्हणून आर्मी वेल्फेअर फंडला ५ कोटी निधी देण्यात यावा, अशी एक अट होती. तीदेखील मान्य झाली.
पाक कलाकारांना पूर्वीपासूनच विरोध
केवळ आताच नव्हे तर यापूर्वीही पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात मनसेने आवाज उठवला होता, असे राज म्हणाले. पाकिस्तानात आपल्या चित्रपटांवर बंदी घातली जाते, तर मग आपण कशाला त्यांना कामे देतो, याचा विचार निर्मात्यांनी केला पाहिजे. उरी हल्ला हा काही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला पहिला हल्ला नाही, वारंवार असे हल्ले होऊनही यांचे डोळे उघडत नाहीत. आपल्या देशात उत्तम कलाकार असताना त्यांच्यासाठी पायघड्या अंथरायच्या कशाला, असा सवालही त्यांनी केला.
गुंडगिरीसमोर मुख्यमंत्री झुकले
ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला विरोध करत मनसेने मल्टिप्लेक्समध्ये तोडफोड करण्याचा इशारा दिला होता. धमकी, आर्थिक कोंडी करणे हे बेकायदेशीर आहे. पाक कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय हा केंद्राने घ्यायचा आहे. केंद्र जोवर निर्णय घेत नाही, तोपर्यंत कायदा-सुव्यवस्था राखणे ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. परंतु राजकीय गुंडगिरीसमोर मुख्यमंत्री स्वतःच झुकले. - सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते
हा तर शहीद जवानांचा अपमान
पाकिस्तानी कलाकार असलेला ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीत ५ कोटी रुपये जमा करण्यावर सेटलमेंट करून राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे शहीद जवानांचा अपमान केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. सेटलमेंट घडवून आणणे नव्हे. - नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
पुढील स्लाइडमध्ये वाचा, का आहे मनसेचा विरोध...
बातम्या आणखी आहेत...