मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभास्थानावरुन सुरू असलेला गोंधळ मिटला असून पुण्यातील सर परशुरामभाऊ (एस.पी.) महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी सभा होईल. राजकीय कार्यक्रमांना मैदान न देण्याचा एस.पी.चा पायंडा यामुळे मोडणार आहे. या मैदानावरची शेवटची राजकीय सभा तीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच घेतली होती, हे विशेष.
सभास्थानाचा मुद्दा मनसेने प्रतिष्ठेचा केला होता. पोलिसांनी परवानगी न दिल्यास टिळक चौकात सभा घेण्याचा इशाराही मनसेने दिला होता. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी अलोट गर्दी लोटण्याचा अंदाज असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती पोलिसांसमोर होती. आता रविवारी सायंकाळी सात वाजता एसपीच्या मैदानावर राज यांची सभा होईल. स्वत: राज यांचे भाषण रात्री साडेआठच्या सुमाराला सुरू होणार असल्याचे मनसेच्या
पदाधिका-यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आरंभ पुण्यातील जाहीर सभेतून करण्याचा राज यांचा इरादा आहे. पुण्याच्या मध्यवस्तीतच ही सभा होण्यासाठी ते आग्रही होते. या दृष्टीने एस.पी.चाच पर्याय उपलब्ध होता; परंतु हे महाविद्यालय चालवणा-या शिक्षण प्रसारक मंडळाने राजकीय सभांना मैदान न देण्याचा ठराव केल्याने अडचण आली होती. मुठा नदीच्या पात्रात सभा घेण्यासही परवानगी मिळालेली नव्हती.
सरकार, पोलिस नरमले
राज यांच्या सभेला परवानगी न मिळाल्यास संघर्षाची स्थिती होऊ शकते, या भीतीने पोलिसांची काळजी वाढली होती. पोलिसांचे सभेसाठीचे पर्याय मनसेने नाकारले. यामुळे मनसेला हव्या असलेल्या मैदानासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारीच एस.पी.मध्ये ठाण मांडून बसले. तरीही संस्थेच्या विश्वस्तांनी मैदान न देण्याचा निर्णय बहुमताने घेतला. मनसे कार्यकर्ते बिथरण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांनी अखेरच्या क्षणी मध्यस्थी केली.
भाजपला धास्ती
2012 च्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राज यांची सभा पुण्यात झाली. त्यानंतरची पुण्यातील त्यांची पहिलीच सभा आहे. मनसेचे पुणे लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार दीपक पायगुडे यांच्यावर सभेच्या तयारीची जबाबदारी आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा सभेत होण्याची शक्यता आहे. या सभेची सर्वाधिक धास्ती भाजपने घेतली आहे. 2009 च्या निवडणुकीत राज यांच्या एकाच सभेमुळे मनसेने 75 हजारांहून अधिक मते घेतली होती.
सभेस मैदान दिले; पण अटी लागू
पोलिस आणि सरकारच्या विनंतीमुळे एस.पी.च्या प्रशासनाने सभेला काही तास उरले असताना परवानगीचे पत्र दिले. मात्र, परीक्षांचे दिवस असल्याने अटीही लागू केल्या. सभास्थानी फटाक्यांची आतषबाजी, हुल्लडबाजी करण्यास मनसेला मनाई करण्यात आली आहे.