आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेर्टाच्या निकालानंतर मुस्लिम आरक्षणाचा निर्णय - देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धर्माच्या आधारे घटनेनुसार आरक्षण देता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण दिले नाही. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले. मात्र समाधान न झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग केला.

मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचा तारांकित प्रश्न बुधवारी गाजला. काँग्रेसचे संजय दत्त व इतर सदस्यांनी हा प्रश्न मांडला होता. ‘उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाच्या पाच टक्क्यांचे नोकरीतले आरक्षण स्थगित केले, मात्र शैक्षणिक आरक्षण अबाधित ठेवले. मात्र संबंधित अध्यादेशाची मुदत संपताना नवा अध्यादेश सरकारने का काढला नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल, असा खुलासा केला.
मुस्लिम धर्मातल्या मागास समाजाला आजही आरक्षणाचा लाभ दिला जात आहे.’ मात्र मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत आहेत, असा आरोप केला. त्यानंतरही मुख्यमंत्री आपल्या पूर्वीच्याच विधानावर ठाम राहिले. त्यामुळे विरोधी बाकांवरील सदस्यंानी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत सभात्याग केला.

पुरावे गाेळा करण्याचे काम चालू
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. तेथे राज्य सरकारच्या वकिलांना आपली बाजू अधिक मजबुतीने मांडण्यासाठी मदत व्हावी म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती मराठा समाज कसा मागासलेला आहे याचे पुरावे गोळा करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संविधानिक मार्गाने आरक्षणावर तोडगा
धनगर समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. कार्यवाही सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण देणे कसे गरजेचे आहे हे स्पष्ट करणारे पुरावे गोळा करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे काम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला (टीआयएसएस) दिले आहे.या संस्थेच्या अहवालावर आधारित हे आरक्षण देण्यासाठी शासन केंद्र सरकारकडे शिफारस करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...