आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Delhi Assembly Result Political Shocks In Maharashtra

दिल्लीतील राजकीय भूकंपाचे महाराष्ट्रात हादरे; शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे-NCP

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारचा पाठिंबा शिवसेना काढेल असे वाटत नाही. सत्तेत कमी वाटा दिल्याने काही पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना भाजपवर दबाव टाकत आहे. शिवसेनेची खरोखरच हिंमत असेल तर फडणवीस सरकारचा पाठिंबा काढावा व सत्तेतून पायउतार व्हावे. आम्ही सेनेची साथ देत भाजपविरोधात मतदान करू व त्यांचे सरकार पाडू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या तर आम्ही त्यास तयार आहोत असेही मलिक यांनी स्पष्ट केले.
भाजप व शिवसेनेत वाक्ययुद्ध रंगल्याने राज्यातील युती सरकारबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. देशाची राजधानी दिल्ली विधानसभेचे आज निकाल जाहीर झाले. दिल्लीत आम आदमी पक्षाने 70 जागांपैकी तब्बल 67 जागा जिंकत देशात राजकीय भूकंप घडविला. दरम्यान, दिल्लीतील या राजकीय भूकंपाचे महाराष्ट्रातील राजकारणाला हादरे बसू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवालांचे फोन करून जाहीर अभिनंदन केले. एवढेच नव्हे त्यानंतर तासाभराने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपला चांगल्याच डागण्या देत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.
देशातील जनता अस्वस्थ आहे, जनतेला गृहित धरू नका. दिल्लीकर जनतेनं दिल्लीश्वरांना दिलेला इशारा असल्याचे सांगत उद्धव यांनी मोदी-शहा जोडीवर शरसंधान साधण्याची संधी सोडली नाही. दरम्यान, केंद्रात व राज्यात आपल्याच सरकारमध्ये सत्ता उपभोगत असताना थेट पंतप्रधानांवर टीका केल्याने भाजपचाही तोल ढासळला. शिवसेनेने मोदींमुळे मिळालेली सत्ता प्रथम सोडावी मगच त्यांच्यावर टीका करावी असा सडेतोड सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
भाजप-शिवसेनेत शाब्दिक युद्ध रंगले असताना राजकीय विश्लेषकांत मात्र वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. सत्तेत चांगला वाटा दिला नसल्याने शिवसेना भाजपसोबत समाधानी नाही. त्यामुळे आगामी काळात योग्य संधी पाहून शिवसेना सरकारच्या बाहेर पडेल व फडणवीस सरकार पाडून राज्यात निवडणुकीची मागणी करेल असे बोलले जात आहे. राज्यातही राजकीय भूकंप होणार का व झाल्यास राष्ट्रवादीची काय भूमिका असेल हे जाणून घेतले असता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपला पुन्हा पाठिंबा देणार नाही असे स्पष्ट सांगितले. फडणवीस यांनी सरकार स्थापन केले तेव्हा भाजपने शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले. कारण राष्ट्रवादीने सरकार स्थापनेआधीच भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळेच शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी पुन्हा कोणती भूमिका घेते याबाबत उत्सुकता होती. मात्र, भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीतच मोठे रामायण घडल्यानंतर आता भाजपला पाठिंबा देणार नाही व निवडणुकीस आमचा पक्ष सामोरे जाईल अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे.