मुंबई- दूध व्यवसायातील देशातील अग्रणी असलेली अमूल कंपनी विदर्भात 400 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. शेतकरी आत्महत्येच्या समस्येने ग्रासलेल्या विदर्भाला या गुंतवणूकीचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल व विदर्भातून भविष्यात आताच्यापेक्षा चार ते पाच पट दुधात वाढ होईल असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केली.
नितीन गडकरी यांनी नुकताच गुजरात दौरा केला. त्या वेळी त्यांनी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन आणि अमूल कंपनीशी चर्चा केली. अमूल विदर्भातील सद्य:स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अमूल समूहाकडे काही योजना आणण्याचा आग्रह धरला होता. याच पार्श्वभूमीवर अमूलने 400 कोटींच्या प्रकल्पासाठी इच्छा दर्शवली असल्याचे गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले, अमूलने नुकताच खानदेशातील जळगावमध्ये डेअरी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गंत अमूल लोकांकडून दूध खरेदी करेल आणि नंतर त्यावर प्रक्रिया केली जाईल. दरांच्या बाबतीत अमूल सध्या आघाडीवर आहे. पुढील वर्षांत रोज 38 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक दुधावर प्रक्रिया करून उत्पादने तयार करण्याच्या उद्देशाने अमूल अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. दूध डेअरीच्या या प्रकल्पाव्यतिरिक्त मधमाशी पालन, शेळीपालनसारखे काही प्रकल्प मोठ्या स्तरावर राबवण्याचा निर्धार असल्याचेही गडकरी यांनी या वेळी सांगितले.
अमूलचा प्रकल्प अमरावतीत?
अमूल विदर्भात स्थापणार असलेल्या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. दुध उत्पादनासाठी पूरक वातावरण व अन्य बाबी अमरावती जिल्ह्यात मुबलक प्रमाणात आहे. पाणी, चारा, कुशल मनुष्यबळ, कौशल्य, तंत्रज्ञान, दळणवळण यासारख्या सुविधा जिल्ह्यात उपलब्ध असल्याने अमूलचा हा नियोजित प्रकल्प अमरावती जिल्ह्यात स्थापन केला जाऊ शकतो. पशुधनाचा विकास दुधाच्या प्रतवारीचा दर ही अमरावती जिल्ह्याची जमेची बाजू आहे. दुध उत्पादनाचा व्यवसाय करणारा गवळी समाज मोठ्या प्रमाणावर येथे आहे.
पश्चिम विदर्भाच्या या विभागीय केंद्राला जगाच्या आणि भारताच्या नकाशावर नेण्यास या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून त्यामुळे बेरोजगारीची समस्या दूर होण्यास तसेच आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)