मुंबई- भारतरत्न लता मंगेशकर यांनी कॅम्पा-कोला सोसायटीबाबत घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावरच टीका होऊ लागली आहे. बिल्डराच्या चुकीची शिक्षा सामान्य रहिवाशांना नको असे टि्वट करून लतादीदींनी स्वत:वरच वाद ओढावून घेतला आहे. या वादाचे कारण म्हणजे कॅम्पाकोला सोसायटीतील इशा-एकता इमारतीत लता मंगेशकर यांच्या नावाने 802 क्रमांकाचा एक फ्लॅट आहे. त्यामुळे स्वत:चा फ्लॅट वाचवण्यासाठी लतादीदी कॅम्पा कोलातील रहिवाशांचे समर्थन तर करत नाही ना, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होऊ लागली आहे.
लता मंगेशकर यांनी सोमवारी कॅम्पाकोला सोसायटीबाबत चाललेल्या घटनाक्रमाबाबत एक टि्वट केले होते. त्यात लतादीदींनी म्हटले होते की, ''कॅम्पा कोला सोसायटीच्या संदर्भात मी महाराष्ट्र सरकारशी बोलू इच्छित आहे. या इमारतीच्या रहिवाशांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा समावेश आहे. ही इमारत तोडली तर हजारो जण बेघर होतील. आतापर्यंत घर सोडावे लागणार या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बिल्डराच्या चुकीची शिक्षा सामान्य रहिवाशांना मोजावी लागायला नको तो त्यांच्यावर अन्याय ठरेल'', असे लतादीदींनी टि्वट केले होते.
लता मंगेशकर यांनी सर्वप्रथम सध्या राहत असलेल्या पेडर रोडवर मंजूर झालेल्या फ्लॉय ओव्हर ब्रिजला विरोध केला होता. येथे ओव्हस ब्रिज बांधला तर आपण येथे राहणे सोडून देऊ अशी भूमिका लतादीदींनी घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने पुलाची पुढील कार्यवाही थांबवली होती. याबाबत त्यांच्यावर जबरदस्त टीका झाली होती. सामान्य नागरिकांपेक्षा लतादीदींनी विशेष वागणूक हवी आहे का असा सवाल उपस्थित केला होता. राज ठाकरे यांनीही जाहीर सभांतून लतादीदींच्या भूमिकेबाबत कोरडे ओढले होते. आता पुन्हा कॅम्पा कोला सोसायटीबाबत लता मंगेशकर यांनी आवाज उठविला आहे. दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी लतादीदींच्या स्वार्थी भूमिकेवर टीका केली आहे. लतादीदींनी फक्त स्वत:साठी बोलतात त्यांनी गरिबांसाठी पण आवाज उठविला पाहिजे. कॅम्पा कोला पाडताना लतादीदी त्यांच्या पाठिशी उभ्या राहत आहेत पण गरीबांच्या झोपड्या पाडताना व त्यांना तेथून हाकलून देताना, बेघर होताना दिसत नाही का अशी टीका केली आहे.
दुसरीकडे, लतादीदींनी राज्य सरकारला हस्तक्षेप करण्याबाबत म्हटले असले तरी प्रशासकीय यंत्रणांनी यात कोणताही हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ही सगळी परिस्थिती तुम्हालाही माहित आहे त्यामुळे राज्य सरकार काहीही करू शकत नाही असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. कॅम्पाकोलातील रहिवाशांनीही घर खाली केली असली तरी पार्किंगमधून कुठेही जाणार नसल्याची ताठर भूमिका घेतली आहे.
पुढे वाचा, लतादीदींनी केलेले टि्वट...