आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेनंतर भाजपचा नेता कोण? फडणवीस, तावडे की खडसे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राज्यात भाजपचा प्रमुख चेहरा कोण? प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे की विदर्भातील ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, याचा निर्णय बुधवारपासून मुंबईत सुरू होणार्‍या भाजपच्या दोनदिवसीय बैठकीत होईल. सध्या यापैकी प्रत्येक जण केंद्रात जाऊन आपणच राज्यातील प्रमुख नेता असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. याचा विधानसभा निवडणुकीत दुष्परिणाम होऊ शकतो, हे लक्षात आल्याने आता एकच नेता ठरवण्यात येणार येणार आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक 2 व 3 जुलै रोजी होत आहे. मुंडेंविना प्रथमच प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. खरेतर मुंडेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला होता. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीशी मुकाबला एकट्याने करण्याची हिंमत मुंडेंमध्ये होती आणि ती त्यांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिली होती. मात्र आता मुंडे नसल्याने भाजपसमोर मोठे आव्हान आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुकांना सामोरे जाईल, असे बोलले जाते. नरेंद्र मोदींचाही त्यांनाच पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र याविषयी अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपच्या राज्य नेतृत्वातच उद्याच्या महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाची बीजे रोवली गेली आहेत. यामुळे सध्या फडणवीस यांच्यासह तावडे, खडसे व मुनगंटीवार दिल्लीत जाऊन आपणच महाराष्ट्राचे नेते असल्याचे भासवत आहेत.

आज मुंडे असते तर..!
गोपीनाथ मुंडे हयात असते तर राज्यात सत्ता येण्यासाठी महायुतीला कोणीच रोखू शकणार नव्हते. पण, आता तशी परिस्थिती नाही. भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना आता खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, यावर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती भाजप प्रदेशचे सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी दिली.