आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचे विलक्षण हाल; अनेक गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘२६ जुलै २००६’ची अाठवण करून देणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील सर्व रेल्वे ट्रॅक पुन्हा एकदा पाण्याखाली गेले. त्यामुळे शुक्रवारी मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांना शहराच्या सीमेवरच उतरावे लागले. गुजरातमधून येणारा पश्चिम, नाशिक- पुणे येथून येणारा मध्य आणि गोव्यामधून येणारा कोकण असे तीन रेल्वेमार्ग मुंबईत येतात. मात्र, गुरुवारपासून सुुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसून या तिन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली हाेती.

पहाटे पहाटे मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या शुक्रवारी सीएसटी, मुंबई सेंट्रल, टिळक टर्मिनस या मुख्य स्टेशनांमध्ये पोहोचल्याच नाहीत. रेल्वे ट्रॅक्सवर पाणी साचल्याने तब्बल १७ लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस मध्येच अडकून पडल्या होत्या. परिणामी मागून येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचाही मोठा खोळंबा झाला. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्या इगतपुरी, पनवेल, लोणावळा, पालघर या ठिकाणी थांबवण्यात आल्या. या लांब पल्ल्याच्या गाड्या तिथूनच परत वळवण्यात आल्या. त्यामुळे त्यातील प्रवाशांना मुंबईत येण्यास मोठी कसरत करावी लागली.
सकाळी अडकलेल्या लांब पल्ल्यांच्या १७ गाड्यांपैकी महानगरी एक्स्प्रेस सीएसटी स्थानकात दुपारी तीन वाजता पोहोचली. अशा प्रकारे संध्याकाळपर्यंत कल्याणपर्यंत अडकलेल्या गाड्या सीएसटी स्थानकात आणण्याचे काम सुरूच होते. शुक्रवारी मुंबई महानगराच्या बाहेर उतराव्या लागलेल्या प्रवाशांना लोकल किंवा बसेस न मिळाल्याने हजारो प्रवासी रेल्वे स्टेशनांतच अडकून पडले होते. त्यांचेही खूप हाल झाले.

रद्द झालेल्या गाड्या
मध्य रेल्वे
१) मुंबई-पुणे (इंद्रायणी)
२) पुणे-सोलापूर (इंटरसिटी)
३) दादर- मडगाव (जन्मशताब्दी)
४) मुंबई- नांदेड (तपोवन)
५) सोलापूर-पुणे (इंटरसिटी)
६) भुसावळ-मुंबई (पॅसेंजर)

पुणे- मुंबईदरम्यानच्या रद्द गाड्या
१) मुंबई-पुणे (डेक्कन एक्स्प्रेस)
२) पुणे-मुंबई (डेक्कन एक्स्प्रेस)
३) मुंबई-पुणे इंटरसिटी
४) पुणे -मुंबई (इंद्रायणी) एक्स्प्रेस

या गाड्या वळवण्यात आल्या
मध्य रेल्वे
(१) नागपूर-मुंबई (सेवाग्राम) इगतपुरी येथून माघारी
(२) पुणे -मुंबई (सिंहगड) कल्याण येथून माघारी
(३) कोल्हापूर-मुंबई (सह्याद्री) चिंचवड येथून माघारी
(४) मनमाड -मुंबई (चंपावती) कसारा येथून माघारी
(५) मनमाड- ‘एलटीटी’ नाशिक रोडवरून माघारी

पश्चिम रेेल्वे
१) अहमदाबाद -मुंबई (डबलडेकर) बोरिवलीहून माघारी
२) सुरत - मुंबई (राणी एक्स्प्रेस) अंधेरीहून माघारी
३) वलसाड-मुंबई सेंट्रल अंधेरीहून माघारी
४) भूज-दादर (एक्स्प्रेस) बोरिवलीहून माघारी
५) अहमदाबाद -मुंबई (पॅसेंजर) पालघरहून माघारी