आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

330 किलो वजन घटवून इमान अबुधाबीला रवाना, ‘सैफी’तून इमानला डिस्चार्ज नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफी रुग्णालयातून इमानला बाहेर काढताना माेठी गर्दी झाली हाेती. - Divya Marathi
सैफी रुग्णालयातून इमानला बाहेर काढताना माेठी गर्दी झाली हाेती.
मुंबई - जगातील सर्वात लठ्ठ ५०० किलाे वजन असलेली महिला इमान अहमद ३३० किलो वजन कमी करून पुढील उपचारासाठी अबुधाबी येथे गुरुवारी रवाना झाली. ८१ दिवसांच्या उपचारानंतर आता तिचे वजन १७० किलो झाले आहे. सैफी रुग्णालयातून तिला डिस्चार्ज देण्यात आला असला तरी डॉ. लकडावालांच्या मते, तिला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला नसून पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

जर्मनीहून अाणलेल्या हायड्रोलिक स्ट्रेचरवरून तिला रुग्णालयातून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तिच्यासाठी  रुग्णालय ते मुंबई विमानतळ  अशी  ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था केली होती. त्यामुळे रुग्णालय ते मुंबई विमानतळ हे २० किलोमीटरचे अंतर १ तास २० मिनिटात पार करता अाले. तिच्यासाठी कार्गो विमानात विशेष एअरबसची व्यवस्थाही करण्यात आली होती. या प्रवासात इमानसाेबत तिची बहीण आणि अबुधाबीच्या बुर्जिल रुग्णालयातील १५ डॉक्टरांचे पथक व परिचारिकाही होत्या. 
 
इमानवर ‘सैफीत’ अतिशय योग्य उपचार केल्यामुळेच तिचे वजन कमी झालेे. तिला क्रेनच्या साहाय्याने रुग्णालयात आणले होते. पण नेताना ग्रीन कॉरिडोरच्या साहाय्याने नेण्यात आले आहे. यावरूनच सर्व काही स्पष्ट होते, असे बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. मुजफ्फर लकडावाला यांनी सांगितले.   इमानला ११ फेब्रुवारीला इजिप्तहून मुंबईला आणण्यात आले होते. 
 
इमानच्या उपचारावर शंका व्यक्त करणारी तिची बहिण शायमाने जाताना ‘सैफी’च्या डाॅक्टरांचे अाभारही मानले नाहीत. अबुधाबीत उपचारानंतर इमानला चालणेही शक्य होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. तेथील रुग्णालयातही इमानवर ‘सीएसअार’च्या माध्यमातून माेफत उपचार करण्यात येणार अाहेत.
 
परिचारिका शिकल्या अरबी 
इमानासाठी सैफी रुग्णालयात विशेष परिचारिकांची टीम तयार करण्यात आली होती. पण इमानची भाषा वेगळी असल्याने संवाद साधण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे परिचारिकांनी  अरबी भाषेचे शिक्षण घेतले. दैनंदिन जीवनात गरज असणारी लहान-लहान वाक्ये या
परिचारिकांनी शिकून घेतली होती. 
 
इमानवर यशस्वी उपचार झाल्याने परिचारिका अाजही खूप खुष हाेत्या  मायदेशी जाण्याअगाेदर परिचारिकांनी इमानला गुलाबाची फुले देऊन तिच्या चांगल्या अाराेग्यासाठी शुभेच्छा दिल्या. काही परिचारिकांनी तर इमानला भरपूर चाॅकलेट्स भेेट दिली.
 
‘सैफी’तून इमानला डिस्चार्ज नाही  
इमानला सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला नसून  तिला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सैफी व बुर्जिल या दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टर मिळून इमानवर उपचार करणार आहेत. मी बॅरिअॅट्रिक सर्जन आहे, मेंदूविशारद तज्ज्ञ नाही. त्यामुळे इमानवर अबुधाबी येथे फिजिओथेरपी आणि मज्जासंस्थेशी निगडित आजारावर उपचार केले जाणार आहेत, असेही डॉ. लकडावाला यांनी सांगितले.  
 
पुढील स्लाईड्समध्ये वाचा... इमानच्या शस्त्रक्रियेचा प्रवास...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...