आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला वसई- पालघरमधील स्थानिक व आदिवासींचा विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जपानचे पंतप्रधान शिंजो अबेंच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे गुरुवारी धडाक्यात भूमीपूजन झाले. मात्र, यानंतर वसई-पालघर परिसरातील आदिवासी भूमीपुत्रांनी या बुलेट ट्रेनला विरोध सुरु केला. बुलेट ट्रेन ही आमच्यासारख्या गरिबांसाठी नव्हे तर फक्त श्रीमंतांसाठी धावणार आहे. मात्र, त्यासाठी आमच्या जमिनी जाणार आहेत. यामुळे पालघर जिह्यातील शेतकरी आणि आदिवासी देशोधडीला लागणार आहेत. मोदी सरकार हुकूमशही पद्धतीने हा प्रकल्प राबवत असून जीवात जीव असेपर्यंत या विरोधात लढू व प्रखर लढा उभारू असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
 
गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळा पार पडत असतानाच बोईसर येथे शेकडो शेतकरी आणि आदिवासींनी रेल्वे स्थानकावर येऊन बुलेट ट्रेन विरोधात आंदोलन केले. पालघरमधील अनेक शेतकरी हे अल्पभूधारक असून या प्रकल्पात त्यांच्या जमिनी गेल्यास उपासमारीची वेळ येऊन ते देशोधडीला लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 
 
नायगाव, वसई, नालासोपारा, विरार या रेल्वे मार्गांवर रोज प्रवाशांचे बळी जातात. हे जीव आधी वाचवा, महिलांची सुरक्षा वाढवा, प्लॅटफॉर्मवरील अर्धवट सोयीसुविधा पूर्ण करा, लोकलच्या फेऱया वाढवा, प्रसाधनगृहांच्या सोयी द्या, मोदींनी बुलेट ट्रेनचा हट्ट सोडावा आणि सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी लोकल रेल्वेत सुधारणा कराव्यात असेही स्थानिकांनी मागणी केली.  
बातम्या आणखी आहेत...