आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीमंत्री खडसेंच्या गावात कृषी महाविद्यालय, वर्धा-नांदेड रेल्वेमार्गासाठी 1 हजार कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयात प्रतिवर्षी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून 64 शिक्षक आणि 37 शिक्षकेतर अशा 101 पदांना मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 65 कोटी 70 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
राज्यात शेती उत्पादनात जळगाव जिल्हा अग्रेसर असून या जिल्ह्यात केळी, बोर, सीताफळ, डाळींब, पेरू इत्यादी फळपिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मात्र, या जिल्ह्यात कृषी महाविद्यालय नव्हते. जिल्ह्यातील मुक्ताईनगर या तालुक्याच्या ठिकाणी कृषी महाविद्यालय झाल्यास जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची सोय उपलब्ध होऊन शेतीचा सर्वांगीण विकास करणे शक्य होणार असल्याने येथे कृषी महाविद्यालय स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला.
वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड रेल्वे मार्गासाठी एक हजार कोटी देण्यास मान्यता-
वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वे मार्गाचा सुधारित खर्च 2 हजार 501 कोटी 50 लाख रूपये असून त्यातील राज्य शासनाच्या 40 टक्के सहभागापोटी एक हजार कोटी 42 लाख रूपयांचा निधी केंद्र शासनास टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे वर्धा ते यवतमाळ-पुसद-नांदेड असा थेट ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उपलब्ध होणर असून या चार महत्त्वपूर्ण शहरांकरिता तसेच वर्धा, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यांकरिता रेल्वे सुविधांचा विस्तार होणार आहे.
हा मार्ग 284 किलोमीटर अंतराचा असून सुमारे 30.5 किलोमीटरवरील 119 हेक्टर भूमी अधिग्रहण पूर्ण झाले आहे. तसेच नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील 945 हेक्टर भूमी अधिग्रहित करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर 93 कोटी 76 हजार रूपये खर्च झाला असून त्यापैकी 50 कोटी राज्य तर 43 कोटी 76 हजार रूपये रेल्वे मंत्रालयातर्फे खर्च करण्यात आले आहेत.
राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळून ते प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी काही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये राज्याचा 40 ते 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी 40 टक्के सहभागाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात भूसंपादनाचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...