आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Minister Eknath Khadase Comment On Sugarcane And Banana Water Ban

ऊस, केळीसाठी पाण्याच्या वापरावर निर्बंधाचा विचार; खडसेंची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘ऊस आणि केळीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी ऊपसा होत असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या पाणी वापरावर निर्बंध आणण्याचा विचार राज्य सरकार करीत असून या पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यावर भर दिला जाईल,’ अशी माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी दिली.

यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य सरकारने ५३ हजार २८२ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट निश्चित केल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे गुरुवारी यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृषी मंत्री एकनाथ खडसे, सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी. बियाणे महामंडळ, कृषी विकास महामंडळाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी सांगितले, ‘राज्य कायमस्वरुपी टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे त्यादृष्टीनेच उपाययोजना केल्या जात आहेत. सन २०१५-१६ मध्ये असमाधानकारक पाऊस झाला असला तरी कापूस पिकामध्ये ११ टक्के वाढ अपेक्षित आहे. मात्र तृणधान्य २१ टक्के, खरीप तेलबिया पाच टक्के आणि ऊसात ९ टक्के घट अपेक्षित आहे. सन २०१६-१७ मध्ये १४.९९ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता अाहे. बियाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने तुटवडा भासणार नाही. पीक पद्धतीत बदल करतानाच येत्या काळात १०० टक्के अनुदानावर फळबाग लागवडीला आणि डाळ वर्गीय पिकांच्या लागवडीसाठीही प्रोत्साहन दिले जाईल.’

कृषी मार्केटिंगवर भर
शेतीशी निगडित पणन आणि शेतमालाच्या मार्केटिंगवर भर दिला जाणार असून कृषी क्षेत्राला कृषी पर्यटनाची जोड दिली जाईल. यंदा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम सुरु केला जाईल असे सांगून एकनाथ खडसे म्हणाले, राज्यात जलयुक्त शिवार अभियान चांगल्याप्रकारे राबविले जात आहे. आगामी वर्षात ५१८२ गावांमध्ये हे अभियान राबवले जाणार असून पाऊस चांगला होण्याची शक्यता असल्याने राज्यातील चित्र बदललेले दिसेल अशी आशाही खडसेंनी व्यक्त केली.

तूर संशाेधन केंद्राची उभारणी करणार
>विदर्भ, मराठवाड्यात ६० ते ७० टक्के क्षेत्रात सोयाबीन लागवड केल्याने इतर पिके कमी झाली. त्यामुळे यंदा तूरीसह इतर पिकांची जोड देण्याचा प्रयत्न केला जाईल. केंद्राने राज्यासाठी तूर संशोधन केंद्र मंजूर केले आहे. येत्या काळात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात तूर संशोधन केंद्र उभारणी करण्याचा प्रयत्न आहे.

>ठिबक आणि तुषार सिंचनासाठी सरकारचा आग्रह अाहे. कमीत कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविण्यात येईल. पीक पद्धतीत बदल गरजेचा असून यावर्षी सरकारकडून डाळ वर्गीय पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येईल.