आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्र्यांची घाेषणा: सीताफळाची रबडी, बासुंदी, चाॅकलेट बुलडाण्यात बनणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी सीताफळाची लागवड केली जाते, परंतु प्रक्रिया प्रकल्प नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सीताफळ लागवडीला चालना मिळावी म्हणून प्रक्रिया प्रकल्प बुलडाणा येथे राबवण्यात येणार अाहे. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात सीताफळ लागवडीसाठी प्राेत्साहन देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.   

राज्यात सीताफळ लागवडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी सीताफळ महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्र्यांची भेट घेतली,  असे सांगून पांडुरंग फुंडकर म्हणाले, ‘राज्यात १४ हजार ७११ हेक्टरवर सीताफळाची लागवड होते, परंतु सीताफळाच्या गरावर प्रक्रिया करण्याची सोय राज्यात उपलब्ध नाही. गर लवकर खराब होत असल्याने ताे उणे २० अंशांच्या वातावरणात ठेवावा लागतो. हा गर जास्त दिवस टिकावा यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. एका प्रक्रिया प्रकल्पाला ६० लाख रुपये खर्च येतो. सीताफळ रबडी, बासुंदी लोकप्रिय असल्याने त्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसेच सीताफळ चॉकलेट तयार करण्याबाबतही विचार केला जात आहे. 

सीताफळ एकदा लावले की ३०-४० वर्षे त्याला फळे येतात आणि पाणीही कमी लागते. सीताफळाची योग्य लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले पैसेही मिळतात, त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात याची लागवड करण्यावर भर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’  सोलापूरच्या बार्शीतील एका शेतकऱ्याने ४० एकरवर सीताफळाची लागवड केली आणि एक कोटी रुपयांचा व्यवसाय केला, असेही त्यांनी सांगितले.   

बुलडाणा जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार असून २५० अल्पभूधारक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करून एक हजार हेक्टरवर सीताफळाची लागवड करण्यात येईल.  यासाठी शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येईल व रोजगार हमी योजनेंतर्गत लागवडीची कामे केली जातील. बुलडाण्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिलमध्ये मेळावा घेण्यात येईल आणि जुलैपासून लागवड सुरू होईल, असेही फुंडकर यांनी सांगितले.