आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी विद्यापीठे गाव दत्तक घेणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेतीमधील नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकारने कृषी विद्यापीठांना, महाविद्यालयांना एक गाव दत्तक घेण्यास सांगितले आहे. विद्यापीठांनी त्यांचे काम चार भिंतीत न ठेवता त्याचा फायदा शेतक-यांना त्यांची शेतीची पद्धत सुधारण्यासाठी झाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश असल्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले.
राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे शेतीविषयक अनेक प्रयोग होत असतात, नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते. पण त्याचा उपयोग म्हणावा तेवढा शेतक-यांसाठी होत नाही. तसेच नवीन प्रयोग करून त्याचा प्रत्यक्षात वापर करण्याची संधी विद्यार्थ्यांना अनेकदा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठे, महाविद्यालये आणि अगदी आयटीआयच्या माध्यमातून सुरू असणा-या कृषी संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
त्या विद्यापीठांनी किंवा महाविद्यालयांनी आपलेच गाव दत्तक घ्यायचे आणि तेथील शेतक-यांना मदत करायची. त्यासाठी जमिनीचा पोत, तिथे उपयुक्त पिके, पिकांचे प्रकार, पाण्याची गरज, सेंद्रीय शेती तसेच नवीन तंत्रज्ञान याची माहिती वेळोवेळी शेतक-यांना देऊन त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा, अशी या दत्तक योजनेमागची संकल्पना असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. तसेच केवळ शेतीच्या प्रयोगांवर न थांबता शेती मालाला बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठीही विद्यार्थी शेतक-यांना मदत करू शकतात.
तसेच शेतक-यांच्या आत्महत्या, एक पीक पद्धती किंवा केवळ नगदी पिके घेण्यावर असलेला शेतक-यांचा भर आणि त्यामुळे अनेकदा होणारे नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च किंवा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च मॅनेजमेंट, आणंद या संस्थांना पत्र लिहिले आहे.
शेतक-यापर्यंत योजना पोहोचत नाहीत - गेल्या पाच वर्षातील कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन त्या किती फायदेशीर होत्या यावर एक अहवाल बनवायचा आहे. अनेक सरकारी योजनांमागचा हेतू चांगला असतो, पण त्या शेतक-यांपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाहीत. त्यामुळे जुन्या झालेल्या योजना बंद करून त्याचा निधी चांगल्या नवीन योजनांसाठी वळवता येऊ शकतो, असे विखे-पाटील म्हणाले. या दोन्ही संस्थांनी अद्याप होकार कळवला नसला तरी त्यांच्याकडून सकारात्मक उत्तराची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.