आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयाच्या बिलासाठी काळे कुटुंबाची वणवण; पीडित तरुणाला डिस्चार्ज मिळेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नगर जिल्ह्यातील काष्टी गावात आंतरजातीय प्रेमप्रकरणातून अमानुष मारहाण करण्यात आलेला जखमी युवक आबासाहेब काळे याच्या कुटुंबाकडे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने तो केईएम रुग्णालयातच अडकून पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

22 जून रोजी काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे आबासाहेब काळे या युवकास सवर्ण मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या आरोपावरून मारहाण झाली होती. त्यात आबासाहेबच्या किडन्यांना दुखापत झाली होती. स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किडन्यांना इजा झाल्यामुळे त्याला महागडी औषधी घ्यावी लागली. त्यासाठी मोलमजुरीवर गुजराण करणार्‍या काळे कुटुंबाने लाख रुपये मोजले. रुग्णालयाचे बिल 33 हजार झाले आहे. मात्र ते भरण्यास काळेंकडे पैसे नाहीत.

‘केईएम’चे बिल 33 हजार इतके आहे. मात्र, बिल भरण्यास पैसेच नाहीत. त्यामुळे भावाला अद्याप घरी आणले नाही, अशी माहिती पेशंटचा भाऊ सतीश याने ‘दिव्य मराठी’ला दिली. यापुढे डायलिसिस करावे लागणार आहे. त्याचा खर्च कसा भागवायचा या विषयी काळे कुटुंबीय चिंतेत आहेत. काळे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील आहे. त्यामुळे आबासाहेबवरील उपचार राजीव गांधी जीवनदायी योजनेमधून मोफत व्हावयास हवे होते. मात्र, या योजनेचा लाभ न दिल्यामुळे मोलमजुरीवर गुजराण करणार्‍या काळे कुटुंबीयांना हकनाक लाखाचा भुर्दंड बसला आहे.
आरोपी मोकाट : नऊपैकी चारच आरोपींना पोलिस अटक करू शकले आहेत. मारहाण करणारे आरोपी राष्टÑवादीचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या भावकीतले आहेत. राजकीय दबावामुळे आरोपी अमोल पाचपुतेची अटक टाळली जात असल्याचा आरोप काळे कुटुंबीयांनी केला.

वडील मूकबधिर, आई अपंग
जखमी युवकाचे वडील मूकबधिर असून आई अपंग आहे. मोठा भाऊ मजूर असून कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण गावात या कुटुंबाची दीड एकर जिराईत जमीन आहे. उदरनिर्वाहासाठी काळे कुटुंब गेली 25 वर्षे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात पाचपुते कुटुंबाकडे शेतमजुरी करते.

साडेसात हजारांची मदत
नगर येथील जातीय अत्याचारविरोधी परिषदेत काळे कुटुंबाला साडेसात हजारांची मदत मिळाली. तसेच समाजकल्याण विभागाने त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी ‘अंनिस’ने केली आहे. नगर जिल्ह्यातील लिंपणगाव, चिंबळे, खर्डा, काष्टी या गावांत दलित अत्याचाराची प्रकरणे घडली आहेत.