मुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या सहाव्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी अखिल भारतीय दहशतवादविरोधी आघाडीचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा, अभिनेता अक्षयकुमार व विवेक ओबेराय यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
पारसी जिमखाना येथे "जरा याद करो कुर्बानी' या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन व दहशतवादाविरोधात जनजागृती कार्यक्रम राबविणे हा यामागचा उद्देश होता.
या वेळी बिट्टा, अक्षयकुमार, विवेक ओबेरॉय, विविध शाळांतील मुलांनी दहशतवाद व धार्मिक हिंसाचाराविरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा घेतली. याबरोबर स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी बिट्टा म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी तरुणांनी सुरक्षा दलामध्ये भरती व्हावे. गरज पडल्यास बलिदान देण्याचीही तयारी दर्शवली पाहिजे. सर्वांच्या सहभागातून
आपण दहशतवादाविरुद्ध लढा उभारू. अक्षयकुमारने "सुनो गौर से दुनिया वालो' या गीताच्या ओळी म्हटल्या. मुलांच्या वाढत्या सहभागातून देशभक्तीची प्रचिती येते, असे विवेक ओबेरॉय म्हणाला.