आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aid In The Name Of Uttarakhand; Festival Of Leaders Respect

नाव उत्तराखंडच्या मदतीचे; सोहळा नेत्यांच्या सत्काराचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तराखंडमध्ये आलेल्या भीषण आपत्तीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी मुंबई काँग्रेसने षण्मुखानंद येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर निवडून गेलेल्या नेत्यांचा सत्कारही उरकून घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश आणि कॉँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवत निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे संकेतही दिले.


अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर खासदार मुरली देवरा यांची कायम निमंत्रित म्हणून, खासदार गुरुदास कामत सरचिटणीस म्हणून, खासदार प्रिया दत्त काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आणि खासदार संजय निरुपम यांची सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. या नेत्यांच्या सत्कारानिमित्त मुंबई कॉँग्रेसने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रिया दत्त व मिलिंद देवरा मात्र उपस्थित नव्हते.


मुख्यमंत्र्यांनी निवड झालेल्या नेत्यांचे अभिनंदन करत ही मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. मुंबईतील पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प पूर्ण व्हायच्या मार्गावर असून त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये मुंबईचे स्वरूप बदलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोणी कितीही प्रसिद्धीसाठी माध्यमे वापरली किंवा जाहिरात कंपन्या नेमल्या तरी ते मुंबईची बरोबरी करू शकणार नाहीत, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. मोहन प्रकाश यांनी उत्तराखंडमधल्या आपत्तीबद्दल शोक व्यक्त करत केवळ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहनसिंग तेथे पहिल्यांदा पोहोचल्याचे सांगितले. एवढी मोठी आपत्ती आली असतानाही गुजरातने केवळ दोन कोटींची रुपयांची मदत केल्याचे उदाहरण देत त्याहीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून पाठवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


उत्तराखंडमध्ये दोन हेलिकॉप्टर पाठवणार
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या राज्यातील लोकांसाठी दोन हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन पाठवणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच तेथे सुरू केलेल्या महाराष्ट्राच्या कंट्रोल रूमकडे 50 लाख रुपये रोख दिले असून परत येणा-या लोकांना त्यातून अन्न, प्रवासखर्च आदी भागवता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.


निवडणुकीत नरेंद्र मोदींना गुजरातेतच रोखू : कामत
गुजरातचे प्रभारीपद घेतल्यावर काँग्रेसची कामगिरी तिथे नक्कीच उंचावेल. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढवण्यासाठी मेहनत घेऊ आणि मोदी यांना तेथेच बांधून ठेवू, असे कामत यांनी सांगितले. ‘केंद्रीय मंत्रिपदाचा आपण राजीनामा दिला होता तेव्हा काहींनी आनंद व्यक्त केला, मिठाई वाटली, पण मला आपल्या नेत्यांवर विश्वास होता. गेली 42 वर्षे या पक्षामध्ये आहे आणि पक्ष कधीही सोडला नाही. त्यामुळे निष्ठेने काम करणा-याला नक्कीच यश मिळते’, असे सांगत कामत यांनी श्रेष्ठींचे आभार मानले.


मुंबई काँग्रेसकडून 51 लाखांची मदत
मुंबई काँग्रेसकडून आपत्तीग्रस्त उत्तराखंडला 51 लाख रुपयांची मदत अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मोहन प्रकाश यांच्याकडे सुपूर्द केली. मुंबईतील कॉँग्रेसचे आमदार एक लाख रुपये प्रत्येकी व खासदार दोन लाख रुपये प्रत्येकी मदत करतील, ही मदत एक कोटी रुपयांपर्यंत जाईल, अशी घोषणा मुंबई काँग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी केली. यावेळी गुरुदास कामत यांनी वैयक्तिकरित्या 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली.


कामत यांच्याकडे देशाची जबाबदारीही येईल : प्रकाश
या कार्यक्रमात मोहन प्रकाश यांनी कामत यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्यासारखा उत्तम संघटक पक्षाला मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. कामत यांच्याकडे आधी मुंबईची जबाबदारी होती, आता गुजरात राज्याचे प्रभारी पद आले आहे. उद्या देशाची जबाबदारीही येईल, असे ते म्हणाले. मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामत यांचा या वेळी सत्कार केला.