आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aim Of Election : Ministers Care The Governmental Image

वेध निवडणुकांचे: मंत्र्यांना काळजी सरकारच्या प्रतिमेची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणुकांची चाहूल लागल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये तयारीला सुरुवात झालेली आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही बहुतांश ज्येष्ठ मंत्र्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारची प्रतिमा, भ्रष्टाचार, रखडलेली कामे, गेल्या निवडणुकीतील वचने असे मुद्दे उपस्थित केले. या मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.


मंत्रिमंडळाचे ठरलेले कामकाज झाल्यानंतर सर्व अधिका-यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सरकारी अधिकारी, विशेषत: पोलिसांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. त्यातही श्रेणी तीनच्या कर्मचा-यांमध्ये भ्रष्टाचार वाढल्याचे सांगितले. या सगळ्याचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होत असून निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी त्याचा विचार व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे सरकारच्ोी प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगितले. भ्रष्टाचार केवळ वरच्या पातळीवरच नाही तर जन्मदाखला, एखादे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महापालिका, महसूल विभागातही भ्रष्टाचार होत असल्याचे मंत्री नसीम खान यांनी सांगितले.


समन्वयाचे काय ?
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये समन्वयाचा मुद्दाही बैठकीत आला. त्यावर उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ठरवू, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकारच्या प्रतिमेबद्दल या वेळी सर्वच मंत्री मतभेद विसरून एकत्र आले होते. निवडणुका जवळ आल्याने सरकारच्या प्रतिमेविषयी ते अचानक जागरूक होऊन आज मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार झाला.


भ्रष्टाचार नियंत्रण करू : मुख्यमंत्री
भ्रष्टाचार, रखडलेली कामे, अपूर्ण घोषणा, पुन्हा निवडून येण्यासाठी काही निर्णय याही मुद्द्यांवर नितीन राऊत, जयदत्त क्षीरसागर, बाळासाहेब थोरात, सुरेश शेट्टी आदी बोलले. त्यावर सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचारावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी काही यंत्रणा राबवली जाईल, असे आश्वासन देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळाला शांत करण्याचा प्रयत्न केला.


घोषणा करा : पिचड
सुशीलकुमार शिंदे यांनी वीज बिल माफ केल्याने सरकार निवडून आले होते. तशी काहीतरी घोषणा, निर्णय झाला पाहिजे ज्यामुळे लोक सरकारला मते देतील, अशी अपेक्षा मधुकर पिचड यांनी व्यक्त केली.


कामे रखडली : विखे
अनेक आमदार कामे रखडल्याची तक्रार करतात. महत्त्वाचे प्रकल्पही अद्याप पूर्णत्वास गेलेले नाहीत. सरकारचे भरीव काम दिसण्यासाठी हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे, असे राधाकृष्ण विखे म्हणाले.


‘आदर्श’च्या अहवालावर मौन
पावसाळी अधिवेशनामध्ये ‘आदर्श’चा अहवाल ठेवणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, चौकशी कायद्यानुसार कारवाई होईल, एवढेच उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनअखेरीस मिळालेल्या या अहवालावर अ‍ॅक्शन टेकन रिपोर्टचे काम सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.


हे निर्णयही निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच
अल्पसंख्याकांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण
नागरी सेवा, निमशासकीय सेवेत अल्पसंख्याक उमेदवारांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी ‘मौलाना आझाद मोफत शिकवणी व संलग्न योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेत केंद्रीय नागरी सेवा, राज्य नागरी सेवा अधिकारी, वर्ग-3 सेवा, बँकिंग, अभियांत्रिकी, वैद्यकीय या परीक्षांच्या प्रवेश परीक्षा तसेच 10 व 12 वी मधील अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी विशेष वर्ग सुरू करण्यात येतील. दरवर्षी 4 हजार विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ होईल.


50 गुणवंत मुलींना आयआयटी मार्गदर्शन
11 वी विज्ञानला प्रवेश घेतलेल्या 50 गुणवंत मुलींना आयआयटी- जेईई, एआयईईई आणि इंटरनॅशनल ऑलम्पियाड अशा परीक्षांचे मार्गदर्शन देणा-या नवीन योजनेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासाठी 47.50 लाख खर्च अपेक्षित आहे. मुलींची निवड ‘पेस’ संस्थेमार्फत करण्यात येईल. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना उच्च् शिक्षण देण्यासाठी ही योजना आहे. 10 वी उत्तीर्ण किंवा परीक्षेस बसलेल्या 50 मुलींना दोन वर्षासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना ‘पेस’ संस्थेच्या अंधेरीतील महाविद्यालयात 11 वी विज्ञानला विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. प्रति विद्यार्थी, दरमहा साडेसात हजार खर्च सरकार करेल.