मुंबई - ‘नेबर्स एनव्ही, ओनर्स प्राइड’ या टीव्हीच्या जाहिरातीच्या कॅचलाइनमुळे घराघरांत पोहोचलेले, नितीन ओरायन यांचे विद्यार्थी आता खरोखरच ‘नेबर्स एन्व्ही…’ ठरत आहेत. प्रसिद्धी आणि पैसा मिळवून देणा-या जाहिरात व्यवसायाला रामराम करणा-या ओरायन यांनी विद्यार्थ्यांना केवळ सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकवलीच नाही तर हसत-खेळत आनंददायी शिक्षण कसे द्यावे, याचा एक आदर्शच निर्माण केला आहे.
ओरायन सुमारे दोन दशके मुंबईतील जाहिरात क्षेत्राशी निगडित होते. ठाणे जिल्ह्यात अतिदुर्गम गावांमध्ये २००५ मध्ये त्यांनी शिक्षण कार्याला सुरुवात केली. आजवर अनेक अतिदुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये ओरायन यांनी ‘लर्निंग स्पेस फाउंंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषदांच्या शाळांत इंग्रजी शिकवित आहेत. जाहिरात क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर त्यांनी अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत या मुलांना गोष्टी- कवितांच्या रूपात शिकवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही मुले नितीनदादाकडे आकृष्ट झाली. हळूहळू या मुलांना त्यांच्याच पुस्तकातील धडे शिकविण्यास सुरुवात केली. खेळ, गप्पा, चित्र, गोष्टी या माध्यमांतून ही मुले कधी काळी कठीण वाटणारे इंग्रजी धडे पटापट आत्मसात करू लागले. यातूनच ओरायन यांनी ‘आनंददायी शिक्षण’ ही संकल्पना अमलात आणली. याच आधारे त्यांनी पहिली ते चौथी या इयत्तांची इंग्रजी भाषेची क्रमिक पुस्तके ‘डीव्हीडी’च्या माध्यमातून दृकश्राव्य स्वरूपात तयार केली. ती संस्थेच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्धही करून दिली आहे. ठाणे, पालघर, लातूर, सातारा आणि रायगड जिह्यांमध्ये इ-टिचिंग ही संकल्पना त्यांनी सुरू केली आहे. त्यांचे स्वयंसेवक या शाळांमध्ये जाऊन शिकवितात. सुमारे ३८५६ शाळांमधून दोन लाखांहून अधिक विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत.
टर्निंग पाॅइंट
‘हाऊ टू इंटिग्रेट द सेल्फ’ आणि ‘द प्रिन्सली गिफ्ट’ या पुस्तकाचे लेखक नितीन ओरायन हे जाहिरात क्षेत्रातील एक आघाडीचे नाव. ‘हाऊ टू इंटिग्रेट द सेल्फ’ या पुस्तकाच्या अभिवाचनाच्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील एका लेखकाने हे पुस्तक मातृभाषेत का लिहिले नाही असा प्रश्न त्यांना विचारला आणि ते अस्वस्थ झाले. या अस्वस्थेतूनच त्यांनी मराठी विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेबद्दल भीती कमी करण्याचा उपक्रम हाती घेतला.
माेनिका बनली आेबेराॅयची असिस्टंट कूक
ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी गावातील मोनिका तलवार ही सहावीपासून लर्निंग स्पेसच्या संपर्कात होती. बारावीनंतर तिने हॉटेल मॅनेजमेंट केले. आज ती ओबेरॉय हॉटेलमध्ये असिस्टंट कुक आहे. गणेश जाधव हा सातवीत असताना या संस्थेच्या संपर्कात आला. आज कॉम्प्युटरचा डिप्लाेमा करून तो याच संस्थेचे अकाउंंट सांभाळत आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांना या संस्थेने पायावर उभे केले.
पुन्हा जि.प. शाळेकडे परतले विद्यार्थी
लातूरपासून १० कि.मी. अंतरावरील गाटेगाव येथील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या इंग्रजी शाळेत जात हाेते. त्यांना नेण्यासाठी ४ बसेस गावात यायच्या. मात्र ‘लर्निंग स्पेस फाउंडेशन’च्या उपक्रमामुळे या गावातील जिल्हा परिषद शाळेतच विद्यार्थ्यांना चांगले इंग्रजीचे शिक्षण मिळू लागले. परिणामी, ग्रामस्थांनी
आपल्या मुलांना शहरातून काढून पुन्हा जिल्हा परिषदेत घातले. त्यामुळे सहा महिन्यांतच लातूरहून येणा-या इंग्रजी शाळेच्या बसची संख्या चारवरून एकवर आली.