आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एआयपीएमटी; पेपर पेक्षाही अवघड पहारा, कुठे बाळ्या कापल्या, तर कुठे बटणे तोडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेरमध्ये कानात बॅटरी टाकून अशी झडती घेण्यात आली. - Divya Marathi
अजमेरमध्ये कानात बॅटरी टाकून अशी झडती घेण्यात आली.
मुंबई/ भोपाळ / जयपूर /रांची / पाटणा- दुधाने पोळल्यामुळे सीबीएसईने शनिवारी ताकही फुंकून प्यायले. देशातील ५० हून अधिक शहरांत झालेली एआयपीएमटी बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी कायम स्मरणात राहणारी परीक्षा ठरली. बहुतांश विद्यार्थ्यांच्या मते त्यांना पेपरपेक्षाही कडक पहाऱ्याने घाबरवून सोडले. कडक तपासणी होईल, हे आधीच माहीत होते; परंतु ती इतक्या भयावह पद्धतीने होईल याचा त्यांना अंदाजच नव्हता. परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावरच पुरुष गार्ड हातात कटर, महिला गार्डच्या हातात कात्री, बॅटरी आणि तपासणी उपकरणे होती. या भीषण प्रकारांमुळे अनेक विद्यार्थ्यांना रडू कोसळले, तर काही जण तक्रार देण्यासाठी थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. अनेक ठिकाणी दोन-चार मिनिटे उशिराने पोहोचणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना परीक्षाच देऊ दिली नाही.
जबलपूरमध्ये परीक्षेआधीच अनेक विद्यार्थिनी ढसाढसा रडल्या. परीक्षेच्या दोन तास आधी झालेली झाडाझडती अत्याचारालाही लाजवणारी होती. अनेक विद्यार्थ्यांची एक- दोनदा नव्हे, तर ५-५ वेळा झाडाझडती झाली. प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांना काही ना काही तरी त्रुटी दिसल्या. एका केंद्रावर काही विद्यार्थी टी-शर्ट घालून आले होते. काहीच आढळले नाही तरीही त्यांच्या टी- शर्टची बटणेच तोडली. ‘जणू आम्ही तुरुंगातूनच बाहेर पडलो, असे वाटू लागले आहे,’ असे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. रांचीमध्ये बोटांची टोके, कपाळ, केस, नखांचीही झडती घेतली. सर्वाचे व्हिडिओ चित्रीकरण सुरू होते. ‘आम्ही एखादे पोलिस ठाणे किंवा कोर्ट रूममध्येच आहोत असेच वाटले,’ असे मुंबईतील विद्यार्थ्यांनी सांगितले. अजमेरमध्ये एक शीख विद्यार्थी ९ वाजता केंद्रावर पोहोचला. गार्डने त्याला हातातील कडे काढायला सांगितले. त्याने ‘हा धार्मिक श्रद्धेचा प्रश्न आहे,’ असे सांगत नकार दिला. परंतु ‘ येथे श्रद्धा चालणार नाही, एक तर कडे काढा किंवा घरी जा,’ असे त्याला सुनावले. कुलाब्यातील केंद्रावर १३ विद्यार्थिनी वेळेत पोहोचूनही त्यांना परीक्षेला बसू दिलेे नाही. त्यामुळे ‘प्रिन्सिपल इज टेररिस्ट ऑफ एलटीटीई, त्याला मारले नाही, एवढेच,’ अशी संतप्त प्रतिक्रिया एका पालकाने दिली.

दुधाने पोळले म्हणून : तीन मे रोजीच्या एआयपीएमटीमध्ये हायटेक नकला झाल्या होत्या. त्यामुळे १५ जून रोजी सुप्रीम कोर्टाने पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. नकलांच्या नवनवीन तऱ्हा रोखण्यावर सीबीएसईचा भर होता....

टेस्ट की टेरर....?
-पाटण्यात शर्टाच्या आतमध्येही बॅटरी लावून तपासणी.

-जयपूरमध्ये कानात बॅटरीचा उजेड टाकून झडती घेतली.

-जयपूरमध्ये मुलींच्या वेण्या सोडून बॅटरीने केस तपासले. मुलांच्या पँटचे बेल्ट हिसकावण्यात आले.

-इंदूरमध्ये केस, नखांच्या झडतीनंतर मेटल डिटेक्टरने अलार्म दिल्यामुळे गार्डने जीन्स पँटची बटणे तोडून टाकली.

-इंदूरमध्येच विद्यार्थिनींच्या कुर्तीला तीन-तीन बटणे होती, ती तोडली. एका विद्यार्थिनीच्या ओपन सँडलमध्ये फूल होते. त्यातही उपकरण असू शकते, अशी शंका घेत गार्डने तेही तोडायला लावले.
तिरुवनंतपुरममध्ये ननने स्कार्फ व क्रॉस काढण्यास नकार दिल्यामुळे तिला परीक्षेपासून रोखण्यात आले. तिने वेगळी खोली मागितली, पण त्यालाही नकार दिला.