आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमआराम गाड्यांत ‘एसी’;खाद्यपदार्थ, पाणी मिळणार - दिवाकर रावते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एसटीच्या हिरकणी निमआराम गाड्यांचे रूप बदलण्याचा प्रयत्न आम्ही करत असून पुश बॅक सीट लावून याची सुरुवात करण्यात आली आहे. आगामी काळात या गाड्या वातानुकूलित करण्याबरोबरच थोडे जादा पैसे घेऊन प्रवाशांना गाडीतच फूड पॅकेट आणि पाण्याची बाटली देण्याचाही विचार एसटी महामंडळ करत असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

एसटी जर योग्यरीत्या चालवली तर ती कधीही तोट्यात जाणार नाही. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी स्वस्त प्रवासाचे एकमेव माध्यम आहे, परंतु एसटी बसेसमध्ये सोयी नसल्याने सीट आरामदायक नसल्याने खासगी गाड्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हे सर्व बदलण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याची सुरुवात निमआराम हिरकणी बसेसमध्ये पुश बॅक सीट बसवून करण्यात आला. यामुळे प्रवाशांना प्रवासाचा त्रास होणार नाही. वर्षभरात ५०० हिरकणी बसेसमध्ये पुश बॅक सीट बसवणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.

चांगल्या सुविधा दिल्या की प्रवासी जादा पैसे द्यायला तयार होतात. पुश बॅक सीट लावल्यानंतर आता या बसेस वातानुकूलित करण्याचाही विचार आहे. तसेच बसचा प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून गाडीतच फूड पॅकेट आणि पाण्याची बाटली देण्याच्या योजनेवरही आम्ही विचार करीत आहोत.

प्रवासादरम्यान खाण्यापिण्यासाठी एक बस साधारणत: अर्धा तास एका ठिकाणी थांबते, ही साेय गाडीत उपलब्ध झाल्यास तो वेळ वाचेल. एसटीची सेवा सुधारण्याबरोबरच सध्या एसएमएसद्वारे एसटीचे बुकिंग होते, त्याऐवजी आम्ही एक विशेष मोबाइल अ‍ॅप तयार करणार आहोत. या अ‍ॅपच्या मदतीने तिकीट बुक करणे सोपे होईल आणि एसटीचा नफाही वाढेल, असेही रावते म्हणाले.

जड वाहनांना सेफ्टी गार्ड सक्तीचे
वाळू, दगड वा अन्य प्रकारच्या सामानाची वाहतूक करणार्‍या ट्रक ट्रॉलरना मागच्या बाजूला सेफ्टी गार्ड बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. छोट्या गाड्यांची या ट्रकशी मागच्या बाजूने टक्कर झाल्यास या गाड्या ट्रकच्या खाली जातात आणि गाडीतील माणसे दगावतात. यापुढे टक्कर झाली तरी गाडी ट्रकच्या खाली जाऊ नये म्हणून सेफ्टी गार्ड बसवावा, असा निर्णय लवकरच परिवहन विभाग घेणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...