आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषणबाजी करण्याऐवजी कामे करा, अजित पवार यांनी घेतला कार्यकर्त्यांचा समाचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आता आमच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांसमोर हे केले आणि ते केले, अशी भाषणबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्षात काय करून दाखवले, ते सांगायला हवे. मुख्य म्हणजे त्याचे रिझल्ट दिसले पाहिजेत. नुसत्या फुकाच्या बाता मारू नका, असा दम राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  आपल्या  पक्षातील कार्यकर्त्यांना शनिवारी दिला.  राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा कल्याण येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना पवारांनी सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचाही समाचार घेतला. कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व गणेश नाईक उपस्थित होते.   
 
पवार म्हणाले, भाजपबरोबर सरकारमध्ये असलेल्या  शिवसेनेला सत्तेची ऊबही घ्यायची आहे आणि सरकारविरोधात ढोलही वाजवायचे आहेत. हे म्हणजे दुतोंडी गांडुळासारखे झाले. याच वेळी त्यांनी  राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठी माणसाचा मुद्दा आणणारे आता कुठे गेले? टाळे लावून  घरी बसलेत, असा टोलाही शिवसेनेच्या नेत्यांना लगावला.   गेली तीन वर्षे सत्तेत एकत्र असूनही भाजप-शिवसेना एकमेकांवर कुरघोड्या करताना तसेच धमक्या  देताना दिसतात. ही धूळफेक असून १५ वर्षांनंतर मिळालेली सत्ता दोघेही सोडणार नाहीत. युतीचा मैत्रीधर्म पाळून गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ हे पक्ष एकत्र आहेत; पण आज कुणी कुणालाही चोर म्हणत आहे. खरे तर सगळ्यांनीच पंतप्रधानपदाचा मान राखायला हवा, असा पवारांनी टोला मारला. मेळाव्याच्या  ठिकाणी मोठ्या संख्येने माशा घोंगावत होत्या. हा धागा पकडून पवार म्हणाले, जेव्हा घाण असते, तेव्हा माश्या  येतात. तुम्ही असल्या लोकांना निवडून दिलेत. त्यामुळेच कल्याणमध्ये  माश्यांचे  राज्य पसरले आहे.    
 
बारामतीला कोणतीही लाट हलवू शकत नाही. कारण पक्षाची बांधणी मजबूत आहे. तशी ती सगळीकडे झाली पाहिजे. कल्याणच्या  पदाधिकाऱ्यांनी  हे लक्षात घेऊन यापुढे कामाला लागावे, असे सांगताना शेवटी पवारांनी भाजपवरही टीका केली. जनतेने भाजपला मते दिली,  पण काय मिळाले? महागाई कमी झाली का, देशात काही बदल दिसतोय का, नोटाबंदीने काय साधले, यावर कुणीच का बोलत नाही?,  असा सवालही त्यांनी या वेळी केला. या मेळाव्याला कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गटातटांत राष्ट्रवादी विखुरलेली
ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची  बऱ्यापैकी ताकद आहे. मात्र, ही ताकद गटातटांत विखुरलेली असल्याने त्याचा पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होताना दिसतो. गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, वसंत डावखरे या तीन नेत्यांमधून  विस्तव जात नाही. युवा नेतृत्व म्हणून आव्हाड पुढे येत असताना नाईक व डावखरेंना त्यांचे  नेतेपद मान्य नाही, मात्र शरद पवारांचा हात पाठीशी असल्याने खुलेआम नाईक-डावखरे आव्हाडांना विरोध करू शकत नाहीत. मात्र, त्याच वेळी अजित पवार व तटकरेंचे आव्हाडांशी  जमत नसल्याने पक्षाची विचित्र कोंडी झाली आहे. या परिस्थितीतही आता ठाणे व कल्याण या खासदारकीच्या  दोन जागांवर  पक्षाने लक्ष केंद्रित केले असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून  गणेश नाईकांचे चिरंजीव व माजी खासदार संजीव नाईक यांना तिकीट देण्याचा  पक्ष विचार करत आहे, असे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...