आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajit Pawar And R.R.Patil News In Marathi, Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भ व मराठवाड्याचा भारनियमनाचा मुद्दा गाजला; आबा-दादांमध्ये खडाजंगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी वीज व भारनियमनाचा मुद्दा गाजला. विदर्भ व मराठवाड्यात घरगुती विजेचे कनेक्शन तोडण्यासह भारनियमनावरून उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री अजित पवार व गृहमंत्री आर.आर. पाटील या राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी मराठवाड्यातील बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे व दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण आबांच्या मदतीला धावले. त्यांनीही भारनियमन रद्द करण्याची आग्रही मागणी केली.

विदर्भ, मराठवाड्यात घरगुती व कृषिपंपांची वीज तोडली जात असल्याचे सांगत वीज कंपनीला हा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न पाटील यांनी पवार यांना विचारला. त्यावर पवार यांनी ‘वीज कंपनीकडे पैसे नसल्याने सरकार पैसे देणार का?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावर ‘सरकार आपणच असून तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडेच आहेत. वीज उपलब्ध करून देता येत नसेल, तर खासगी कंपन्यांना कंत्राट द्या,’ असे आबांनी सुनावले.

क्षीरसागर म्हणाले, बीड जिल्ह्यात विजेची स्थिती अत्यंत वाईट आहे. भारनियमनामुळे नागरिक प्रचंड संतापलेले आहेत. यापूर्वीही मी दोन-तीन वेळा हा मुद्दा उपस्थित केला होता; परंतु मला न्याय मिळाला नाही. किमान यापुढे तरी घरगुती वापरासाठी वीज उपलब्ध झालीच पाहिजे, असा पवित्राही त्यांनी घेतल्याचे समजते.

मतदारांना तोंड दाखवणार कसे?
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीच पवारांना घेरल्यावर काँग्रेसच्या मंत्र्यांनीही विजेचा प्रश्न मांडला. निवडणुका तोंडावर आहेत. पुरेशी वीज न दिल्यास मतदारांना तोंड दाखवण्यास जागा उरणार नाही, असे त्यांनी सुनावले. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले.