आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दादा’गिरीने राष्ट्रवादी अस्वस्थ; एकतर्फी कारभाराला ज्येष्ठ नेते वैतागल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकतर्फी कारभारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते व मंत्री प्रचंड नाराज झाले आहेत. परिणामी, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या पक्षात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची दाट शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. छगन भुजबळ, गणेश नाईक, भास्कर जाधव, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, गोविंदराव आदिक यांच्या मनातील सध्या सुरू असलेली घालमेल ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून येऊ शकते, असेही सांगितले जाते.

सध्याच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 62 आमदार आहेत. यापैकी 45 आमदार हे अजितदादांना मानणारे आहेत. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांतच त्यांना पुन्हा पदावर घेण्यासाठी याच आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांवर दबाव आणला होता. गेल्या दशकात पवार दिल्लीत असल्याने त्याचा फायदा घेत अजितदादांनी पक्षात स्वत:चे अस्तिव तयार केले आहे. आता तर त्यांना जास्तीत जास्त जागा जिंकून आणून मुख्यमंत्री व्हायचे आहे. यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून तयारीही सुरू केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्यावर चालणार्‍या बैठका याची साक्ष देत आहेत.

भुजबळ, नाईक कंटाळले
अजितदादांच्या वाढत्या वर्चस्वामुळे पक्षात आपल्याला भविष्य उरणार नाही, या भावनेमुळे सध्या छगन भुजबळ, गणेश नाईक यांच्यासह अनेक दिग्गज नेते अस्वस्थ आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय भुजबळांना रुचलेला नाही, तर पक्षातील पवार लिमिटेड कंपनीच्या कारभाराला नाईक कंटाळले आहेत, असे सूत्रांकडून समजते. राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना कितीतरी बरी होती, हे आता नाईकांचे समर्थक उघडपणे बोलू लागले आहेत. भास्कर जाधव यांना गेल्या वर्षभरात तर बरीच मानहानी सहन करावी लागली. आधी मंत्रिपद गेले, आता प्रदेशाध्यक्षपदावरून दूर केले आणि मंत्रिपद दिले तेही दुय्यम दर्जाचे. जाधवांचे अजितदादा व तटकरेंशी पटत नाही, ही गोष्ट जगजाहीर आहे.

तटकरेंच्या माध्यमातून संघटनेवर पकड
भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून सुनील तटकरेंना त्या जागी आणण्यामागे अजितदादांचे डावपेच होते. दिल्लीत आता सत्ता नसल्याने शरद पवार निराश झाले आहेत. त्यातच राज्यही हातातून गेले तर पक्षाचे काय होणार, या शंकेने पवार अस्वस्थ आहेत. परिणामी येनकेनप्रकारेण अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी टिकून राहणार असेल तर बरेच आहे, असा विचार पवारांनी केला असावा. तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी निवड ही याच विचारातून झाल्याचे मानले जाते.

वळसेंच्या गावात खिंडार
दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व आंबेगाव तालुकाध्यक्ष अरुण गिरे तसेच भीमाशंकर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजीराव ढोबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी
गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला.

जयंत पाटील- वळसेंची कुचंबना
जयंत पाटील व दिलीप वळसे पाटील हे तसे मितभाषी. आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, अशा आशेवर ते आहेत. मात्र, हे दोघेही मोठे होणार नाहीत, याची काळजी अजितदादांनी घेतली आहे. जयंत पाटील काँग्रेसचा विचार करू शकतात, अशी मागे चर्चा होती. तर मंत्रिपद होण्याची क्षमता असूनही आपल्याला संधी दिली जात नाही, अशी खंत वळसेंच्या मनात आहे. ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांनाही बाजूला टाकले गेल्याने आदिकही काँग्रेसमध्ये पुन्हा जाण्याची तयारी करत असल्याचे बोलले जाते.

भारती लव्हेकर, देसार्इंचे राजीनामे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांप्रमाणे पदाधिकारीही खूप नाराज झाले आहेत. राष्ट्रवादीच्या माजी महिला अध्यक्षा, राष्ट्रवादी मासिकाच्या संपादिका भारती लव्हेकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. लव्हेकर लवकरच शिवसेनेत जाणार असल्याचे समजते, तर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात असलेल्या डॉ. गजानन देसाई यांनीही पक्षातील बेशिस्तीला कंटाळून राजीनामा दिला आहे.

(फोटो - उपमुख्यमंत्री अजित पवार )