आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही काही साधुसंत नाही : अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘निवडणुका जिंकायच्या असल्यामुळे लोकाभिमुख निर्णय घ्यावेच लागतात,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘आम्ही साधुसंत नाही’ अशी जाहीर कबूलीही मंगळवारी दिली. दादांच्या या बेधडक वक्तव्याने लोकप्रिय योजनांची लपवाछपवी करणारे त्यांच्या शेजारी बसलेले ‘बाबा’ मात्र क्लिनबोल्डच झाले.

मंगळवारी दुपारी विधिमंडळात लेखानुदान सादर झाले. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये 2000 पर्यंतच्या मुंबईतील बेकायदेशीर झोपडपट्ट्यांचा प्रश्न उपस्थित झाला. विधानसभा निवडणुकीत लाभ उठवण्यासाठी झोपड्यांचा निर्णय राखून ठेवल्याची विचारणा पत्रकारांना केली.

त्यावर पवार म्हणाले, ‘ आम्ही साधुसंत नाहीत. निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय निर्णय निवडणुकाच्या तोंडावर घ्यावेच लागतात.’ दादांच्या या वक्तव्याने वीज दर सवलत, झोपडपट्ट्यांना मंजुरी यामध्ये राजकारण नाही, असे म्हणणारे मुख्यमंत्री मात्र तोंडावर आपटले. यंदा राज्यावर अतिवृष्टी, दुष्काळ अशी संकटे ओढावल्याने उपाययोजना करण्यासाठी मोठा निधी खर्ची पडला. त्यामुळे नऊ हजार कोटी रुपयांची तूट पडल्याचे पवार यांनी सांगितले.

वीज दरवाढीमध्ये दिलेली सवलत यामुळे महसूली खर्चांमध्ये अधिक वाढ झाली, त्यामुळे ही महसूली तूट पडल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी मान्य केले. राज्याला उद्योग क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी कंपन्यांना वीजेमध्ये सवलत देण्याचा निर्णयाचे त्यांनी जोरदार समर्थन केले.

मुंबईत टाटा, रिलायन्स आणि बेस्ट यांच्या वीज दरांमध्ये तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी ग्राहकांना कंपनी बदलण्याची मोकळीक देण्यात आली आहे. रिलायन्सचे 15 हजार ग्राहक नुकतेच टाटाकडे वर्ग झाले असून मुंबईतील वीजदर एकसमान कसे ठेवता येतील, यासाठी वीज कंपन्यांना कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.