आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला भाजपची उमेदवारी दिली तर हकालपट्टी, दादांचा गावितांना इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादनमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हिना गावित यांना नंदुरबारमधून भाजप लोकसभेसाठी उमेदवारी देत असल्याच्या बातम्यांनी राष्ट्रवादीच्या तंबूत घबराट उडाली आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट डॉ. विजयकुमार यांच्या हकालपट्टीचा इशारा दिला.
राष्ट्रवादी भवनातील पत्रकार परिषदेत सोमवारी या विषयावर उपमुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीची आघाडी आहे. असे असताना डॉ. हिना यांनी काँग्रेस उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणे योग्य नाही. ते आघाडीच्या विरोधात आहे. मात्र, पक्षाचा आदेश धुडकावून डॉ. हिना यांनी भाजपची उमेदवारी स्वीकारली, तर डॉ. विजयकुमार यांची कॅबिनेटपदावरूनच नव्हे, तर राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात येईल.
पक्षाचा आदेश धुडकावणे असो किंवा पक्ष संघटनेच्या विरोधात जाऊन नेत्यांवर टीका करणे असो याबाबत कुणालाच माफी दिली जाणार नाही. मग तो कॅबिनेट मंत्री असो किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता सर्वांना एकच न्याय लावून पक्षाचा बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
माणिकराव गावित यांना काँग्रेसने नंदुरबारमधून उमेदवारी दिली असून माणिकराव 1984 पासून येथून निवडून येत आहेत. माणिकराव यांच्याशिवाय काँग्रेस दुसर्‍या उमेदवाराचा विचारच करत नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी तर आहेच, पण राष्ट्रवादी म्हणजे डॉ. विजयकुमार यांनाही आपल्या पुढच्या पिढीसाठी जागा करता येत नसल्याची खंत वाटते. आपल्या मुलीला डॉ. हिना यांना पक्षातून जागा देणे अशक्य असल्याने त्यांनीच तिला भाजपकडून उमेदवारीसाठी प्रोत्साहन दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
गावित कुटुंब रंगलंय नंदुरबारात!
डॉ. विजयकुमार यांनी आपल्या कुटुंबाला राजकीय चेहरा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या भावाला शरद गावित यांना उमेदवारी देत नाही हे लक्षात घेऊन समाजवादी पार्टीकडून विधानसभेसाठी उभे केले होते. विशेष म्हणजे त्यांना निवडून आणले. आताही भाजपने डॉ. हिना यांना उमेदवारी दिल्यास ते आपली सारी राजकीय ताकद तसेच आर्थिक पाठबळ मुलीला देऊन जिंकून आणतील, यात शंका वाटत नाही. प्रसंगी पक्षालाही ते आव्हान देतील, असे सूत्रांकडून समजते.

पुढील स्लाइडमध्ये, नंदुरबार गिनीज बुकच्या उंबरठ्यावर