मुंबई - यापुढे महाराष्ट्रातील सत्तेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अशी गर्जना करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार
आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. दक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाणांना पाडण्यासाठी त्यांनी जोरदार व्यूहरचना केली असून त्यांनी अपक्ष उमेदवार विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा दिला आहे. ही व्यूहरचना करताना त्यांनी ‘एक बटण दाबा, दोन आमदार निवडून द्या,’ अशी घोषणा केली आहे.
मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात बोलताना पवारांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. राज्यातील बुजुर्ग उमदेवारांना पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. सांगोल्यात गणपतराव देशमुखांविरोधात आम्ही उमेदवार देणार नाही. तसेच उंडाळकरांनाही राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल.
उंडाळकरांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी सक्रिय सहभाग घेईल, असे पवार म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण हे विधान परिषदेवर निवडून गेले असल्याने ते आधीच आमदार आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा निवडून देऊन आपले मत वाया घालवू नका. त्यापेक्षा उंडाळकरांना विजयी करा. म्हणजे एकाच बटणात दोन आमदार निवडून देता येतील आणि एकाच मतदारसंघात दोन आमदार निवडून दिल्याचे समाधानही तुम्हाला मिळेल, असा आमचा प्रचार असेल, असे पवारांनी सांगितले.
वाटेत आलात, तर सोडणार नाही!
मी कधीही कोणाच्या वाटेला जात नाही. त्याची अडवणूक करत नाही, त्रास देत नाही, पण माझ्या वाटेला कोणी येत असेल, तर त्यालाही मी सोडत नाही, असे सांगत पवारांनी अप्रत्यक्षरीत्या पृथ्वीराजांना इशारा दिला.
पृथ्वीराज चव्हाण यांना चेटकिणीची महत्त्वाकांक्षा!
पृथ्वीराज माझ्या विरोधात भ्रष्टाचाराविषयी संशयाचे वातावरण निर्माण करत आहेत. अजित पवारांची राक्षसी महत्त्वाकांक्षा असल्याचे ते आता उघड बोलत आहेत. मात्र, माझी राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल, तर पृथ्वीराजांची चेटकिणीची महत्त्वाकांक्षा आहे, असे मला म्हणावे लागेल. ते पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्रात आले ते मुख्यमंत्री होण्यासाठी. ही त्यांची महत्त्वाकांक्षा नव्हती का, असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा
विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अजित पवार हा सामना रंगणार आहे. विलास उंडाळकरांना राष्ट्रवादी पाठिंबा देणार हे लक्षात येताच पृथ्वीराजांनी राष्ट्रवादीचा उमेदवार राजेंद्र यादवला निवडणुकीआधीच आपल्या बाजूने वळवून घेतले. यादवांनी उमेदवारी मागे घेत पृथ्वीराजांना पाठिंबा दिला. उंडाळकरांना पाठिंबा देऊन यादव यांचा डमी उमेदवार म्हणून वापर करण्याचा अजित पवारांचा डाव पृथ्वीराजांनी उधळून लावला.