मुंबई- राज्यातील 11 मंत्र्यांनी एका वर्षात जनतेचे 1 कोटी 83 लाखांहून अधिक रूपये आपल्या सरकारी बंगल्याच्या रंगरंगोटीवर उडविल्याची माहिती उजेडात आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करू असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच सरकारी बंगला, सुरक्षा व गाडी नाकरणारे अरविंद केजरीवाल सध्या देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. असे असताना महाराष्ट्रातील मंत्री व नेते सरकारी बंगल्यावर व विमानप्रवासावर कोट्यावधी रूपये खर्च केल्याचे माहिती अधिकारात पुढे आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, चेतन कोठारी व सहका-यांनी याबाबतची माहिती मागितली होती. त्यात ही बाब पुढे आली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, मंत्र्यांच्या बंगल्यांवर झालेल्या खर्चाबाबत आम्ही चौकशी करू. याचबरोबर विक्रांतला वाचविण्यासाठी त्याबाबतचा मुंबई महापालिकेकडून आलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडू व चर्चा करून त्यासाठी काय करता येईल याचा विचार करू. लोकसभेच्या जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, हा विषय राज्यस्तरीय नसून ते राष्ट्रीय पातळीवर सोडविला जाईल. सोनिया गांधी आणि शरद पवार याबाबत जो निर्णय घेतील व तोच अंतिम असेल.
दरम्यान, मंत्र्यांच्या बंगल्यांवर झालेल्या खर्चाची चौकशी करू म्हणणा-या अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याचा खर्च मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यापेक्षा जास्त झाला आहे. 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 या काळात अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानासाठी 37 लाख 98 हजार रूपये खर्च केले आहेत. तर, चव्हाण यांच्या वर्षा निवासस्थानाच्या खर्चासाठी 33 लाख रूपये खर्च केले आहेत. याचबरोबर इतर 8 मंत्र्यांच्या बंगला दुरुस्तीवर 1 कोटी 54 लाख रूपये उधळले आहेत.
राज्यातील मंत्र्यांनी बंगल्यांवर लाखो रूपये उधळले असले तरी विमान प्रवासासाठी कोट्यावधींची उड्डाणे केली आहेत. गेल्या वर्षी राज्याच्या मंत्र्यांनी विमान प्रवासावर 2 कोटी 10 लाख रूपये खर्च केले आहेत. तर गेल्या 3 वर्षात एकून 43 मंत्र्यांनी 6 कोटी 28 लाख रूपये खर्च केले. यात सर्वात जास्त विमान प्रवासाची उड्डाणे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी घेतली असून, त्यांनी तब्बल 40 लाख रूपये यावर खर्च केले आहेत.
पुढे वाचा, कोणत्या मंत्र्यांने किती केला बंगल्यावर खर्च...