आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Tables Rs 5,417 Cr Deficit Maharashtra Budget

हातचे राखून कोटींची उड्डाणे; पाच हजार कोटी तुटीचे हंगामी बजेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने मंगळवारी कोणतीही करवाढ नसलेला 5 हजार 417 कोटी 28 लाख रुपयांच्या तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) सादर केला. जूनमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याने सुरू असलेल्या योजना व सवलती कायम ठेवण्याचाच प्रयत्न अर्थमंत्री अजित पवार यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकांमुळे काही योजना राखून ठेवल्याची कबुलीही त्यांनी नंतर दिली. शिवाय बजेटमध्ये मराठवाड्यासाठी कोणतीही ठोस तरतूद झाली नाही.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हे हंगामी बजेट सादर करण्यात आले. या वेळी अर्थमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, राज्याच्या जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. अन्न, रोजगार, निवारा आणि आरोग्य या विषयांवर भर देऊन जनतेला दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. महावितरणच्या घरगुती, वाणिज्य, औद्योगिक तसेच यंत्रमागधारक ग्राहकांना वीजदरांत 20 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचेही पवार यांनी सांगितले.

दरडोई उत्पन्न वाढल्याचा दावा
गेल्या दशकात राज्याच्या दरडोई उत्पन्नात 24 हजार 35 रुपयांवरून 1 लाख 5 हजार 493 रुपयांपर्यंतची वाढ झाली असून ऊर्जा उत्पादनात 64 हजार 138 दशलक्ष किलोवॅट तासावरून 89 हजार 465 दशलक्ष किलोवॅट तास इतकी मजल मारली आहे, असा दावाही अर्थमंत्री पवार यांनी केला.

औरंगाबादसाठी लागेल तेवढा निधी.
औरंगाबाद जिल्ह्यातील म्हैसमाळ, खुलताबाद, शूलिभंजन आणि वेरूळ या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगताच विरोधी बाकांवरून नेमका आकडा किती ते सांगा असा धोशा झाला. तेव्हा पवार यांनी लागेल तेवढा निधी देऊ असे सांगत वेळ मारून नेली.

आचारसंहितेमुळे खर्च नाही, तूट भरून निघेल
अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट अशा तिन्ही नैसर्गिक आपत्तींना या एकाच वर्षात सामोरे जावे लागले. त्यामुळे शिलकीचा अर्थसंकल्प तुटीत गेल्याचे सांगून अर्थमंत्री म्हणाले, पुढील वर्षातील चार महिने आचारसंहितेत जाणार असल्याने आमदारांकडून खर्च केला जाण्याची शक्यता कमी असल्याने वर्षअखेर ही तूट भरून निघेल.

वीजदराचा शॉक, दुष्काळाचा चटका
महसुली जमांचे उद्दिष्ट गाठले असले तरी वीज दरात सवलत, टंचाई निवारणार्थ आलेला खर्च यामुळे सुरुवातीच्या महसुली आधिक्याचे रूपांतर 3 हजार 17 कोटी 23 लाख रुपयांच्या तुटीत झाले. सध्या अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि लोकोपयोगी योजनांमुळे तूट स्वीकारावी लागल्याचे अर्थमंत्र्यांनी भाषणात नमूद केले.

निवडणुकीमुळे हात राखून
अधिक योजनांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला नाही. नव्या योजना दिल्या नाहीत, कारण हे हंगामी बजेट आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही योजना आम्ही राखून ठेवल्या आहेत. आम्ही काही साधुसंत नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

विरोधी बाकांवर शांतता
अर्थमंत्री पवार यांनी मंगळवारी हंगामी अर्थसंकल्प सादर केला, त्यांनी 40 ते 45 मिनिटे भाषण केले. त्यांच्या भाषणात एकदाही व्यत्यय आला नाही. विरोधी बाकांवरून जोरदार विरोध झाला नाही. विनाव्यत्यय पार पडलेले हे अलीकडच्या काळातील पहिलेच अर्थसंकल्पीय भाषण.

रुक्ष आकडेवारीचा भडिमार
एरव्ही अर्थसंकल्पीय भाषणांत कविता, किस्से, शायरी ऐकायला मिळते. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी कविता आणि शेर सादर केला होता. त्याआधीच्या अर्थसंकल्पीय भाषणातही अनेकदा कविता, शेरोशायरी ऐकायला मिळायची. अजित पवार यांनी आकडेवारीने भरलेले रुक्ष भाषण वाचून दाखवले.