आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajoy Mehta Replaces Sitaram Kunte As New BMC Commissioner

भाजपचा मास्टर स्ट्रोक, आयुक्त कुंटेंची उचलबांगडी, मेहता नवे अायुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांना हटवून त्यांच्या जागी महावितरणमधील वादग्रस्त सनदी अधिकारी व सध्याचे पर्यावरण सचिव अजोय मेहता यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची ही खेळी असल्याचे मानले जाते. शिवसेनेवर दबाव वाढविणे आणि भविष्यात होणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण निर्णयांचे श्रेय भाजपलाच मिळावे, अशा दुहेरी हेतूने ही बदली करण्यात आली असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा अाहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्रायल दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पर्यावरण सचिव मेहता यांची मनपा अायुक्तीपदी तर कुंटेंची त्यांच्या जागी बदली केली. मेहतांनी सोमवारीच कार्यभारही स्वीकारला. मुंबई महापालिका निवडणुकीला अजून दोन वर्षे आहेत. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुका युतीने लढविल्यानंतरही निकालानंतर मात्र भाजप-शिवसेनेतील संघर्ष चांगलाच पेटला आहे. त्यामुळे शिवसेनेवर दबाव वाढविण्याचे भाजपने ठरवले असून त्या खेळीचा एक भाग म्हणून औरंगाबादेत अडीच वर्षांसाठी महापौरपद मागण्यात आले आहे, तर मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना नेतृत्वाच्या जवळ असलेल्या सीताराम कुंटे यांची बदली करून शिवसेनेला एक संदेश देण्यात आला आहे.
कुंटे यांना महापालिकेत ४ वर्षे झाली होती. तरीही त्यांना काही काळ याच पदावर ठेवले जाईल, अशी चर्चा होती. मात्र महापालिकेत भाजपचे कुंटेंशी संबंध नेहमीच कटुतेचे राहिले. भाजपचे पालिकेतील नेते अमित साटम यांनी रस्त्यांवर एलईडी लाइट लावण्याचा आग्रह धरला तेव्हा कुंटेंनी त्यास नकार दिला. यानंतर आमदार गोपाळ शेट्टींसह भाजपचे नेते त्यांना भेटले तेव्हाही कुंटेंनी एलईडी कंपन्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्याचा दबाव आणू नका, सध्याची लाइट व्यवस्था उत्तम आहे. एलईडी खरेदीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर बोजा पडेल, असा तर्क देत भाजप नेत्यांचा प्रस्तावही धुडकावून लावला होता.

मुंबई महानगराचा वादग्रस्त विकास आराखडा (डीपी) तयार करणाऱ्या कंपनीला क्लीन चिट देऊन या आराखड्यातच काही सुधारणा करण्यात येतील, असे वक्तव्य त्यांनी केल्याने सरकारच्या हा आराखडा रद्द करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उमटले होते.
भाजप-राष्ट्रवादी मैत्रीपर्व...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ‘खास’ मानले जाणारे अजोय मेहता हे वीज निर्मिती कंपनीत अनेक वर्षे काम करीत होते. या काळात मोठमोठे घोटाळे झाल्याचा आरोप झालेलेे अाहेत. मात्र पवारांची मर्जी सांभाळणाऱ्या मेहतांना कुणीही हात लावू शकले नाही. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तरीही पवारांच्या मर्जीतील या अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेत "अर्थ'पूर्ण नियुक्ती देऊन राष्ट्रवादीच्या मदतीची परतफेड करतानाच निवडणुकीसाठीची राजकीय सोयही भाजपने केल्याची चर्चा अाहे. मुंबईतील चटई क्षेत्र वाढवणे, नवे गृहनिर्माण धोरण आणणे आणि फंजीबल चटई क्षेत्र रद्द करणे असे महत्वाचे प्रस्ताव सध्या राज्य सरकार वा महापालिका पातळीवर विचाराधीन असून यात अनेकांचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत.
विकास अाराखड्यावर भाजपचा डाेळा
भविष्यात तयार होणाऱ्या मुंबईच्या नव्या विकास अाराखड्यात भाजपला हवे असलेले मुद्दे आणि भूखंडांचे आरक्षण असावेत, म्हणून मेहतांना कुंटेंच्या जागी पाठवण्यात आले आहे. शिवसेनेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची अडवणूक करून शिवसेनेवर भविष्यातही असाच दबाव कायम ठेवण्याची रणनीतीही यामागे असल्याची चर्चा अाहे. कुंटे हे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. याशिवाय मुंबई भूमिगत जलवाहिनी, लेक टॅपिंग हे महत्त्वाकांक्षी प्रकल्पही त्यांच्यामुळेच पूर्ण झाले.