आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बेस्ट'च्या जाहिरातींचा यूपी सरकारचा फंडा, मुंबईतील मतदारांपुढे अखिलेश सरकारचे कौतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अखिलेश यादव यांच्या सरकारने सुरू केले आहेत. मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसेसमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सगळे कसे खुशहाल व प्रगतिशील आहे याच्या दीड मिनिटाच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखवल्या जाऊ लागल्या आहेत. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती "बेस्ट'च्या सूत्रांनी दिली.

मुंबईत बेस्टच्या ४५०० बसेस दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करतात. उत्तर भारतीय मोठ्या संख्येने राहत असलेल्या भागांत ये-जा करणाऱ्या बेस्ट बसेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेल्या आहेत. यूपीत मेट्रो, २४ तास वीज, पाणी, शेतकऱ्यांना मदत, उत्कृष्ट शिक्षण संस्था यांची माहिती देऊन अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करीत असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. दोन हजार बसेसमध्ये रोज दिवसातून १५ ते २५ वेळा या जाहिराती दाखवण्यात येत असल्याची माहिती आहे. पण यासाठी किती पैसे मोजण्यात आले याची माहिती मात्र मिळू
शकली नाही. यूपी सरकारच्या कामाच्या जाहिराती मुंबईत करण्याबाबत सपा नेत्यांना विचारले असता ते म्हणाले, मुंबईत जाहिराती केल्याने येथील उत्तर भारतीय गावी असलेल्या आपल्या नातेवाईंकांना मतदान करण्यास प्रेरित करीत असल्याचे लक्षात आल्याने त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना त्यांच्या राज्यात होत असलेल्या बदलाची माहिती असली पाहिजे. त्यासाठी म्हणूनही येथे जाहिराती करण्यात येत असल्याचे सूत्राने स्पष्ट केले.
बसेसच्या स्क्रीनवरही फिरत्या जाहिराती
बेस्ट बसेसमधील स्क्रीनवर जाहिरातींचे कंत्राट रिअलटाइम मीडियाला देण्यात आलेले आहेत. या कंपनीने सर्व बसेसमध्ये मोफत एलसीडी स्क्रीन लावले असून त्यांची देखभाल हीच कंपनी करते. या बदल्यात जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न कंपनी स्वतःकडे ठेवते. अखिलेश यादव यांच्या जाहिरातींवरील खर्चाबाबत माहिती घेण्यासाठी कंपनीकडे वारंवार संपर्क साधला असता कोणीही फोन उचलला नाही.
मुंबईतील ४० लाख मतांवर डोळा
मुंबईत उत्तर भारतीयांचे ‘उत्तर भारतीय संघ’ नावाने मजबूत संघटन आहे. संघाच्या सदस्याने सांगितले की, मुंबईत ४० लाख उत्तर भारतीय असून यापैकी दहा टक्के उत्तर प्रदेशमध्ये जाऊन मतदान करतात. मुंबईतही हेच उत्तर भारतीय मतदान करतात. दोन-दोन ठिकाणी मतदान कसे करतात? असे विचारले असता या सदस्याने त्याबाबत उत्तर देण्याचे टाळले.
भाजपनेही खेळले उत्तर भारतीय कार्ड
उत्तर भारतीय संघाचे गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष असलेले आर. एन. सिंह यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले आहे. यामागेही उत्तर प्रदेश आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आर. एन. सिंह यांचे उत्तर भारतीयांमध्ये विशेष स्थान नसल्याने भाजपला त्याचा म्हणावा तसा फायदा होण्याची शक्यता कमी असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...