आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All 9 Accused Of 2006 Malegaon Blast Case Discharged By Mumbai Court.

मालेगाव बॉम्बस्फोटातील नऊ मुस्लिम आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मालेगावात 2006 मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटप्रकरणी दहा वर्षांपासून खटला सुरू असलेल्या आठ जणांची विशेष मोक्का न्यायालयाने सोमवारी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अन्य एका आरोपीचा अगोदरच मृत्यू झाला आहे. या निकालामुळे महाराष्ट्र पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी पथकाच्या तपासाचे वाभाडे निघाले आहेत. जातीय सलोखा बिघडवण्यासाठी स्फोट घडवल्याचा आरोप ठेवत एटीएसने या ९ जणांना अटक केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास केल्यावर या ९ जणांचा बाॅम्बस्फोटांशी काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले होते.

नाशिक जवळील मालेगाव येथे हमिदिया मशिदीशेजारी दफनभूमीलगतचा परिसर ८ सप्टेंबर २००६ रोजी साखळी बाॅम्बस्फोटांनी हादरला होता. चारपैकी तीन स्फाेट मशिदीजवळ, एक दफनभूमीलगत मुशावर चौकात झाला होता. यात ३७ जण ठार, तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. शब्बे बारातच्या रात्री दफनभूमीजवळ उभ्या सायकलींवर बाॅम्ब ठेवण्यात आल्याचे तपासात उघड झाले होते. प्रकरणाच्या तपासात एटीएसने नुरुल समसुदा, शब्बीर मसिह उल्ला (मृत), रईस अहमद मन्सुरी, डाॅक्टर सलमान अब्दुल डाॅक्टर फरोक मगदुमी, शेख मोहंमद अली शेख, आसिफ बशीर खान, झायेद अब्दुल अन्सारी, आणि अब्ररार अहमद गुलाम यांना अटक केली होती. याखेरीज रियाज सफी अहमद, इस्तियाक मोहम्मद इसाक, मुनव्वर मोहंमद अमिन यांच्यासह मुज्जमील नामक पाकिस्तानी नागरिकाला फरारी घोषित केले होते. अटकेतील ९ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून खटलाही सुरू करण्यात आला होता. यातील एकास सरकारी साक्षीदार करण्यात आले. मात्र सुनावणीदरम्यान त्याने साक्ष फिरवली आणि प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली होती.

एटीएस, सीबीआयच्या तपासातील दावे एनआयएच्या तपासात ठरले फोल
प्रकरणाच्या सोमवारच्या सुनावणीत एनआयएने आपले म्हणणे मांडले. आपल्या तपास अहवालात एटीएस व सीबीआयने केलेल्या दाव्यांची पडताळणी केली. त्यात आपण जमवलेले पुरावे आणि तपासात समोर आलेल्या बाबी एटीएस व सीबीआयच्या तपासातील पुराव्यांशी जुळत नसल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. अखेर एनआयएचा युक्तिवाद आणि आरोपींचा दावा ग्राह्य धरत तसेच योग्य ते पुरावे सादर करण्यास तपास यंत्रणेला अपयश आल्याचे सांगत न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष ठरवले.

कलाटणी : असीमानंदाच्या जबाबानंतर वेगळे ४ जेरबंद
> स्फोटाचा तपास एनआयएकडे गेला तेव्हा दिशाच बदलली. त्याचदरम्यान स्वामी असीमानंद याने चौकशीत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. पुढे असीमानंदच्या जबाबाच्या आधारावर एनआयएने चार वेगळ्या आरोपींना या प्रकरणात अटक केली. त्यांच्याविरुद्ध २५ मे २०१२ रोजी आरोपपत्र दाखल केले.

> विशेष म्हणजे या आरोपपत्रात या ९ आरोपींचा उल्लेखही नव्हता. यामुळे एटीएसच्या तपासावर प्रश्नचिन्ह आले होते. परिणामी ९ जणांना जामिनावर सोडून प्रकरणाचा तपास नव्याने सीबीआयकडे सोपवण्यात आला. याआधारेच या ९ आरोपींनी मुक्त करण्याची मागणी केली. त्यावर न्यायमूर्ती व्ही.व्ही. पाटील यांच्यासमोर युक्तिवाद सुरू होता.

एनआयएने पकडलेले आरोपी : १. मनोहर नरीवाला ऊर्फ सुमेर ठाकूर
२. राजेंद्र चौधरी (दशरथ), ३. धान सिंह ४. लोकेश शर्मा (सर्व तुरुंगात..)
पुढे आणखी वाचा, कसा आहे या प्रकरणाचा घटनाक्रम?