आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सर्व जिल्हे उपग्रहाच्या माध्यमातून जोडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील सर्व जिल्हे उपग्रहांच्या (व्ही सॅट) माध्यमातून जोडण्याची योजना येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. संपूर्ण जिल्हे जोडण्यासाठी अत्यंत कमी खर्च येत असतानाही यापूर्वी हे काम का केले गेले नाही, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
या योजनेबाबत सूत्रांनी सांगितले, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये दळणवळणाची साधने म्हणावी तशी सक्षम नाहीत. अजूनही मोबाइल टॉवरवर अवलंबून राहावे लागते. इंटरनेटसाठी ब्रॉडबँड वापरले जाते. परंतु एखादी आपत्ती आली आणि मोबाइल टॉवर उद्ध्वस्त झाले तर त्या भागाशी संपर्क साधणे कठीण होऊन जाते. अनेक दुर्घटनांमध्ये संपर्क होण्याची समस्या समोर आली होती. परंतु आता संपूर्ण राज्य उपग्रहांच्या माध्यमातून जोडल्यास पूर, वादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीत संपर्क करणे सोपे जाणार आहे.
या उपग्रहांच्या माध्यमातून संदेशांचे वहन करणे अत्यंत सोपे असते. केवळ संपर्कच नव्हे तर टेलिमेडिसिनसारख्या उपक्रमासाठीही उपग्रहांचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो. उपग्रह संदेश प्रकाशाच्या वेगाने येत असल्याने ब्रॉडबँडपेक्षा चांगला वेग उपलब्ध होणार आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट सेवा नाही त्या ठिकाणी उपग्रहांद्वारे वेगवान इंटरनेट उपलब्ध करून देता येणार आहे. इंटरनेटसाठी असा कायमस्वरूपी वेग मिळत असल्याने अनेक सरकारी कामे अत्यंत मागास भागातील नागरिकांपर्यंतही थेट पोहोचवणे शक्य होणार आहे. या कामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपग्रहाकडून संदेश प्राप्त करणारी यंत्रणा उभी करण्यात येणार असून यासाठी फक्त १२ ते १३ कोटी रुपये खर्च येणार आहे.
काय आहे उपग्रह योजना
इन्सॅटमालिकेअंतर्गत आजपर्यंत अनेक उपग्रह अवकाशात सोडले गेले आहेत. या उपग्रहांच्या माध्यमातूनच टेलिकम्युनिकेशन आणि वाहिन्यांचे प्रसारण केले जाते. हे उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. या उपग्रहांना आरसे बसवलेले असतात. पृथ्वीवरून पाठवलेले संदेश उपग्रहाला प्राप्त झाल्यास ते प्रकाशाच्या वेगाने पृथ्वीवर परत येतात. त्यामुळे इंटरनेट सेवा अत्यंत उत्कृष्टपणे वापरली जाऊ शकते. उपग्रह अवकाशात असल्याने त्यांच्यावर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होत नाही आणि संदेशवहन विनाअडथळा होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...