आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election Propoganda Stop, All Eyes On Result

धामधूम थांबली, आता धाकधूक; राज्यात सगळ्यांच्या ‘स्वबळा’ची उद्या होणार सत्त्वपरीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जवळपास पंधरा दिवस राज्यभर उडालेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी सायंकाळी खाली बसला. राज्याच्या २५ वर्षांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच पंचरंगी निवडणूक होत असून २८८ जागांसाठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान होईल.

विधानसभेची ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. २५ वर्षांपासूनची युती आणि १५ वर्षांपासूनची आघाडी तुटल्यानंतर शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या निवडणुकीत ‘एक्स फॅक्टर’ म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करत असून या पाचही राजकीय पक्षांचा कस या निवडणुकीत लागणार आहे.

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक करिश्म्यावर ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्यात तब्बल २७ प्रचारसभा घेतल्याने त्यांच्यावर टीकेचा प्रचंड भडिमार झाला. शिवसेनेशिवाय पहिल्यांदाच निवडणूक मैदानात उतरलेल्या भाजपने प्रचारासाठी मोदींचाच आधार घेतला. या प्रचारसभांमधून मोदींनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. महाराष्ट्र कसा पिछाडीवर पडला हे पटवून देताना मोदींनी गुजरातच्या विकासाचे गोडवेही गायले. मोदींनी मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा प्रत्येकच सभेत आधार घेण्याचा प्रयत्न केला. मोदी हे महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत आहेत, असा आरोप सर्वच राजकीय पक्षांकडून झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले खरे पण देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यासारखे राज्यातील नेते मात्र स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लावून धरत राहिल्याने या मुद्द्यावरील भाजपची दुटप्पी भूमिकाही प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारांना पाहायला मिळाली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेची ग्वाही देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रचारसभांमधून नरेंद्र मोदी हेच टीकेचे प्रमुख लक्ष्य राहिले. १५ वर्षांपासून सत्तेत राहिलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांवर टीका करण्याचे टाळत भाजप आणि मोदींनाच लक्ष केले खरे, परंतु काही काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती करू शकतात, अशी आवई उठवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही प्रचारसभा घेतल्या. यूपीए सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचत त्यांनीही मोदींवर टीकेची झोड उठवली. शेतक-यांना ८००० कोटींची वीज सबसिडी, मराठा, मुस्लिम आरक्षण, मुंबई मेट्रो, रस्ते, शिक्षणाचा विकास या मुद्द्यांवर दोन्ही काँग्रेसच्या प्रचाराचा भर होता तरीही मोदींनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

ठळक वैशिष्ट्ये
* 25 वर्षांच्या इतिहासात राज्यात पहिल्यांदाच पंचरंगी निवडणुका.
* 27 सभा मोदींच्या. विधानसभेसाठी पंतप्रधानांनी एवढ्या सभा घेण्याची पहिलीच वेळ.
* 15 ऑक्टोबरला मतदान
* 8.25 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील आणि हवे ते सरकार निवडतील.
* 4119 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात १,६९९ अपक्षांचा समावेश आहे.
* 19 ऑक्टोबरला मतमोजणी

मुद्दे बाजूला, एकमेकांवर आगपाखड
पंचरंगी लढतीमुळे प्रचाराची व्यापकता वाढली होती. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरामुळे भाजपला मिळालेल्या यशानंतर यंदा सर्वच पक्षांनी या माध्यमाचा वापर करून घेतला, तर दूरचित्रवाणीवरूनही जाहिरातींचा धडाका लावला. मात्र, विकासाचे मुद्दे मांडण्याऐवजी एकमेकांवर आगपाखड केली.

शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराची धडपड
स्वबळावर निवडणूक लढवणा-या सर्व पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही अखेरच्या क्षणापर्यंत प्रचारसभा, पदयात्रांवर भर दिला.
पुढे पाहा पक्षीय बलाबल...