आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All MLA Demanding Water From Upper Godavari In Assembly Council

जायकवाडीत आजच पाणी सोडा,’ मराठवाड्यातील आमदारांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘नाशिक, नगर जिल्ह्यांतील धरणे अर्धी भरली असताना जायकवाडीत मात्र 3 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे गोदावरीच्या ऊर्ध्व खो-यातील धरणे काठोकाठ भरण्याची वाट न पाहता, जायकवाडीत आजच्या आज पाणी सोडा,’ अशी आग्रही मागणी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.


आमदार सतीश चव्हाण यांनी पाणी सोडण्याविषयी मंगळवारी लक्षवेधी सूचना मांडली होती. वरील भागातील पालखेड, गंगापूर, भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणे 70 टक्के भरली आहेत. जायकवाडीवर दहा शहरे, तीन औद्योगिक वसाहती व 205 गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. धरणातील 30 टक्के पाणी पिण्यासाठीच लागते. यंदा पावसाने ओढ दिल्यास ऊर्ध्व भागातील धरणांमधून पाणी सोडण्यास स्थानिकांचा विरोध होईल. म्हणून 20 टक्के पाणी आजच सोडा, अशी मागणी अमरसिंह पंडित यांनी केली.


मेंढेगिरी अहवालानंतर निर्णय : तटकरे
मागील वर्षी पाऊसमान कमी होते. त्यामुळे नियोजन फसले. यंदा पाऊस चांगला आहे. पाणी विनिमयासाठी नेमलेल्या मेेंढेगिरी समितीचा अहवाल 15 दिवसात मिळेल. त्यानंतरच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिले.


आधी आमची धरणे भरू द्या : जाधव
जलसंपदामंत्री मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसत असून आजच्या आज पाणी सोडा, अशी मागणी अमरसिंह पंडित, विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमर राजूरकर, विनायक मेटे, सुरेश नवले यांनी केली. वरची धरणे भरल्याशिवाय पाणी सोडू देणार नाही, असे नाशिकमधील राष्‍ट्रवादीचे आमदार जयंत जाधव म्हणाले. त्यावर शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी ‘जाधव यांना बसवा,’ अशी मागणी केली. दोघांत या वेळी बाचाबाचीही झाली.


ऑक्टोबर उजाडण्याची चिन्हे
सत्ताधारी आमदारांना स्वपक्षाच्याच मंत्र्याशी दोन हात करावे लागत असल्याबद्दल विनोद तावडे यांनी आश्चर्य व्यक्त केले. खो-यातील पाणीसाठ्याचा सप्टेंबर 2013 अखेरीस आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच नियमन केले जाईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री तटकरे यांनी या वेळी केली. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्यास ऑक्टोबर उजाडण्याची चिन्हे आहेत.


जायकवाडीत 3.5 टक्के साठा
औरंगाबाद । पाऊस थांबल्यामुळे जायकवाडीतील ओघ मंदावला असला तरी नागमठाण धरणातून 4000 क्युसेक्स पाणी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा मंगळवारी 3.34 टक्के झाला. दरम्यान, नांदूर-मधमेश्वरच्या कालव्यातील पाणी नगरकडे वळवण्यात आले आहे. पाणीसाठ्यात तीन दिवसांत सरासरी एक टक्का वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात धरणात 18.18 दलघमी पाणी आले आहे. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा सुमारे 73, तर एकूण साठा 810 दलघमी झाला आहे. 1 जूनपासून जायकवाडीमध्ये 240 दलघमी पाणी आले आहे.