आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांतीचा महासागर! मोर्चाने मुंबईतील गर्दीचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा क्रांती मूकमोर्चाचे वादळ अखेर बुधवारी मुंबईत धडकले. वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावर निघालेल्या या मोर्चाने मुंबईतील आतापर्यंतच्या गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडले. लाखोंच्या संख्येने लोक असूनही अतिशय शिस्तबद्ध व शांततेने मोर्चा पार पडला. पाठाेपाठ रस्त्याच्या स्वच्छतेची काळजीही घेण्यात अाली. आतापर्यंत राज्यात झालेल्या ५८ मराठा मोर्चांमध्ये हा सर्वात माेठा मोर्चा ठरला. केवळ मुंबईतील नव्हे तर राज्यातील विक्रमी माेर्चा म्हणूनही त्याची नाेंद हाेईल.

जिजामाता उद्यानाच्या परिसरातही मोर्चाच्या पूर्वसंध्येलाच मोर्चेकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे दाखल होऊ लागले होते. अनेकांनी रात्री याच ठिकाणच्या फुटपाथवर मुक्काम ठोकला होता. सकाळी सात वाजेपासून गर्दी जमू लागली होती. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांसोबत स्वयंसेवकही कार्यरत होते. मेगाफोनवरून वाहतुकीबाबतच्या सूचना देण्यात येत होत्या. रस्त्याच्या आजूबाजूला ग्रामीण भागातून आलेले मोर्चेकरी पदपथावरच पथारी पसरून घरून आणलेली शिदोरी उघडून न्याहारी करताना दिसत होते. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी अनेक जण सेल्फी आणि फोटो काढण्यात मग्न होते. थोड्या थोड्या वेळाने शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा आसमंतात दुमदुमत होत्या.   

साधारण अकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या पुढे महिला तर त्यांच्यामागे अफाट भगवा जनसमुदाय असे चित्र पुर्ण मार्गावर होते. हा मोर्चा ज्या दक्षिण मुंबईतून जाणार होता, त्या परिसरातील शाळांना सुटी देण्यात आली होती, तर बहुतांश व्यापारी आणि दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. आसपासच्या इमारतींमधील रहिवासीदेखील आपल्या खिडक्या आणि गॅलऱ्यांमधून या अफाट जनसागराला न्याहाळताना दिसत होते. मोर्चाच्या मार्गावर वेळोवेळी ध्वनिक्षेपकाद्वारे मोर्चेकऱ्यांना शांत राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.    

विक्रमी गर्दी, पण नेमकी किती? आयोजकांचा दावा १५ लाखांवर लोक  
आयोजकांनी १५ लाखांच्या गर्दीचा दावा केला तर पोलिस अधिकाऱ्यांच्या मते हा आकडा चार ते पाच लाख असेल. मोर्चाची सांगता झाल्यानंतर अनेकांनी व्यासपीठाजवळ न जाता परतीचा मार्ग धरला. त्यामुळे गर्दीचा एकगठ्ठा अंदाज बांधणे अवघड असल्याचे पाेलिसांचे म्हणणे अाहे. मात्र गर्दीचा उच्चांक असल्याचे त्यांनी मान्य केले.

तब्बल २०० किमी उलटी कार चालवून गाठली मुंंबई  
मराठा क्रांती माेर्चाच्या निमित्ताने युवकांमध्ये माेठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण हाेते. कुणी वेगवेगळ्या वेशभूषा करून माेर्चात सहभागी झाले हाेते. संताेष राजे या युवकाने चक्क भाेर (जि. पुणे) ते मुंबई दरम्यान सुमारे २०० किलाेमीटर चक्क उलटी (रिव्हर्स) कार चालवून माेर्चात हजेरी लावली. या गाडीच्या मागे- पुढे कार्यकर्त्यांच्या बुलेट व इतर गाड्यांचा ताफाही हाेता. ‘एक मराठा- लाख मराठा’च्या घाेेषणा देत हे मावळे माेर्चात पाेहाेचले. 

संभाजीराजेही जमिनीवर
माेर्चात सहभागी झालेले युवराज छत्रपती खासदार संभाजीराजे जमिनीवर बसून हाेते. हाेते. ‘सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे अापण सहभागी झालाे अाहाेत,’ असे ते म्हणाले.

मराठ्यांच्या एल्गाराला मुस्लिम बांधवांची साथ
मराठा बांधवांची खऱ्या अर्थाने कोणी मने जिंकली असतील तर ती डोंगरी, उमरखाडी, भायखळा, भेंडीबाजार परिसरातील मुस्लिम बांधवांनी.  मोर्चा मार्गावर हजारो मुस्लिम बांधवांनी दुतर्फा उपस्थित राहून मोर्चेकऱ्यांना चहा, पाणी, नाष्टा देत माणुसकीचे अाणि भाईचाऱ्याचे दर्शन घडवले.   

राणीबाग ते जेजे हाॅस्पिटल या दोन किमी रस्त्याच्या दुतर्फा राजकीय पक्षांनी होर्डिंग्ज लावली होती. एकाही राजकीय पक्षाला चहापाण्याची सोय करण्याचा स्टाॅल लावण्याचे सुचले नाही. मात्र, येथील मुस्लिम समुदायाच्या अनेक संघटनांनी चहा-नाष्ट्याची सोय करून ती उणीव भरून काढली.  आॅल इंडिया मिल्ली काैन्सिल संघटनेने इस्माईल मर्चंट चौकात मोठा वैद्यकीय कक्ष उभा केला होता. तेथे १५ डाॅक्टर्स उपस्थित होते. तपासणी अाणि औषधे यांची संपूर्ण सोय मोफत करून देण्यात आली होती. जमियत उलेमा ए महाराष्ट्र या संघटनेचे कार्यकर्ते मोर्चातील प्रत्येकास थंड पाण्याची बाटली आग्रहाने हाती देताना दिसत हाेते.  
 
मुस्लिम राष्ट्रीय मंच या संघटनेने चहापानाची बडदास्त ठेवली होती. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई अध्यक्ष असलेल्या मौलाना आझाद मंच संघटनेकडून मोर्चेकऱ्यांना नाष्टा दिला जात होता. रहेमान ग्रुपकडून प्रत्येकास नाष्ट्याची पाकिटे दिली जात होती.  

परतीचा प्रवास सुखरूप हाेवाे  
‘राजर्षी शाहू महाराजांनी मांडलेली मराठा समाजहिताची संकल्पना व अन्य अठरापगड जाती-जमातीच्या प्रश्नाला सकल मराठा विचारांची साथ राहील. या सर्वसमावेशक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पावले टाकली जातील, अशी माझी सरकारकडून अपेक्षा आहे. मोर्चेकऱ्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा. त्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा.’  
- शरद पवार, ट्विटरवरून

भगवे फेटे मुस्लिमांचे
राणीबागेच्या पदपथावर अनेक तरुण भगवे फेटे बांधून घेत होते. फेटे देणारे मुस्लिम हाेते. शंभर रुपयांत फेटा बांधूनही दिला जात होता. अनेक तरुणांनी डोईवर फेटा चढवून जेजे फ्लायओव्हरवर सेल्फी काढण्याचाही आनंद लुटला.
 
हे पण वाचा, 
 
बातम्या आणखी आहेत...