आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी पोलिस ठाणे कधी उभारणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरणांच्या चौकशीसाठी राज्यात महिला अधिकार्‍यांची कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर महिला पोलिस अधिकार्‍यांची संख्या आणि महिला पोलिस ठाण्यांची उभारणी कधी करणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली आहे. तसेच याप्रकरणी सरकारने 6 मेपर्यंत आपले म्हणणे मांडावे, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा दुबे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती नरेश पाटील आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याच्या वकील अनिता कटारिया म्हणाल्या, राज्यातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत एकही महिला पोलिस अधिकारी नाही. शिवाय इतर जिल्ह्यांत पुरुष पोलिस अधिकार्‍यांच्या तुलनेत महिलांची संख्या खूप कमी आहे. नागपूर शहरातील पोलिस ठाण्यांत फक्त 350 महिला पोलिस अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी केवळ 42 महिला पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या आहेत.
बीड, सोलापूरमध्ये प्रमाण कमी
पोलिस ठाण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला अधिकार्‍यांचे प्रमाण बीड आणि सोलापूरमध्ये खूप कमी आहे. वास्तविक, पास्को कायद्यानुसार अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या प्रकरणात महिला पोलिस अधिकार्‍यांद्वाराच चौकशी होणे अनिवार्य आहे. परंतु, पोलिस दलात पुरुषांच्या तुलनेत महिला पोलिस अधिकार्‍यांचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे अशा प्रकरणात महिला पोलिस अधिकारी उपलब्धच होत नसल्याकडे कटारिया यांनी लक्ष वेधले.